बंदीला केराची टोपली, BBC ने निर्भया डॉक्यूमेंटरी दाखवली

0
12

नवी दिल्ली, दि. ५ – भारत सरकारने बंदी टाकूनही बीबीसी फोर या वाहिनीने निर्भया प्रकरणावरील डॉक्यूमेंटरीचे प्रसारण केले आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास या डॉक्यूमेंटरीचे इंग्लंडमध्ये प्रसारण करण्यात आले.

बीबीसीच्या पत्रकार लेस्ली उडवीन यांनी इंडियाज डॉटर हा माहितीपट तयार केला असून देशाला हादरवून टाकणा-या दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणावर हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. या माहितीपटात निर्भयावर बलात्कार करणारा आणि सध्या या गुन्ह्यात तिहार तुरुंगात शिक्षा भोगणा-या मुकेश सिंह या नराधमाची मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये मुकेश सिंहने त्यांच्या विकृती मानसिकतेचे समर्थन करणारे विधान केले आहे. हा माहितीपट ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त जगभरात प्रसारित करण्यात येणार होता.

माहितीपटातील काही अंशा प्रसारित होताच भारतात माहितीपटावरुन वाद निर्माण झाला. लोकसभा व राज्यसभेतही या माहितीपटाचे पडसाद उमटले असून दिल्लीतील कोर्टाने हा माहितीपट दाखवण्यावर बंदी टाकली आहे. तर केंद्र सरकारनेही या माहितीवर बंदी टाकण्याचे निर्देश दिले होते. माहितीपटामुळे जगभरात भारताचा अपमान होईल अशी भीती व्यक्त झाल्यानंतर केंद्र सरकारने हा माहितीपट जगात कुठेही प्रदर्शित होणार नाही याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र बीबीसीने नियोजित वेळेपूर्वीच स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे) इंग्लंडमध्ये या माहितीपटाचे प्रसारण केले. पिडीतेच्या आईवडिलांच्या सहकार्याने हा माहितीपट तयार केला असून यामाध्यमातून आम्ही गुन्ह्याचे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय आम्ही जबाबदारीने हाताळला असून बीबीसीच्या संपादकीय मुल्यांचे काटेकोरपणे पालन केल्याचे सांगत बीबीसीने माहितीपट प्रसारित करण्याचे समर्थन केले.