शरीराची उपयुक्तता महत्त्वाची

0
37

अलीकडे शाकाहार चांगला की मांसाहार, असा प्रश्न विचारला जातोय. आता अन्नपदार्थांचे नेमके गुणधर्म कळले. त्यामुळे शरीराला काय उपयुक्त आहे, याचा विचार करूनच आपण आहाराची योजना करावी. शाकाहार म्हणजे सात्त्विक आणि चांगला. तर मांसाहार म्हणजे तामसी आणि वाईट, असे ढोबळ निष्कर्ष लावून चालणार नाही. आहार शरीराला पोषक असावा. प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि काही विशिष्ट विकार टाळण्याची त्या आहारात ताकद
असावी. लहानथोरांना सारख्याच प्रमाणात उपयोगी पडणारा असा शाकाहार अस्तित्वात आहे. पाश्चात्त्य देशात तरुण पिढीवर या विचारांचा पगडा जास्त असलेला आढळतो. त्यांची गरज पुरवण्यासाठी आता बरीच रेस्टॉरंट‌्स पूर्ण शाकाहार देतात. त्यात अगदी दूधही नसते आणि भाज्यांचे वगैरे बरेच प्रकार अगदी कमी शिजवलेले किंवा कच्च्या स्वरूपात सादर केले जातात. काही जण सोयीप्रमाणे शाकाहार घेतात. एखादी मांसाची डिस घेऊन त्याच्या जोडीला बरीचशी भाजी अथवा
सॅलड‌्स खाणं म्हणजे शाकाहार घेणं, असं काही मानतात. हे निव्वळ शाकाहारी असण्यापेक्षा ब-यापैकी हेल्दी आहे. फळं, कंद, भाज्या, सॅलड्सच्या भाज्या, तृणधान्य या पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषक गुण मिळतात. तर मांसाहारामधून उत्तम प्रथिने मिळतात. पण मांसाहाराचा अतिरेक झाला तर शरीरात थिजणा-या स्वरूपाची खूपच फॅट साचते. यामुळे रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका निर्माण होतो. जर का काळजी घेतली नाही तर शाकाहारातही अशी चूक होऊ शकते.
शाकाहारी जेवणातूनही खूप तूप पोटात जाऊ शकते. सेव्हन डे अॅडव्हेंटिस्ट या पंथाचे लोक शाकाहारी असतात. त्यांच्या आहारात दूधही नसतं. तर सोयाबीनचा वापर जास्त असतो. त्यांच्यात दीर्घायुष्य असलेलं आढळतं, पण त्याचबरोबर प्रोस्ट्रेटचा त्रास कॅन्सर इत्यादींचा त्रास या पंथातल्या लोकांना असलेला आढळतो. कॅल्शियम कमी पडल्यामुळे फ्रॅक्चरचाही त्रास सेव्हनडे या पंथातल्या लोकांना होतो. अशा या शोधांमुळे असं म्हणता येतं की वरवर दिसतो तसा शाकाहार की मांसाहार हा वाद सोपा नाही. पोषक आहारशास्त्र म्हणजेच न्यूट्रिशन या विषयाची कसोटी लावली असता, अमेरिकन
डायटेटिक असोसिएशनने घालून दिलेल्या नियमावलीच्या हिशोबानं शाकाहार, पोषणमूल्यांच्या बाबतीत बराच खालच्या पायरीवर असल्याचं आढळतं, एकंदरीतच आरोग्याचा विचार करताना शाकाहारातून उत्तम प्रथिने कॅल्शियम आयर्न, बी १२, अशी पोषणद्रव्य कमी पडतात असा निष्कर्ष निघतो. मध्यंतरी डॉ. स्पॉक नावाच्या बालआरोग्यतज्ज्ञाने एकाकी फतवा काढला, की मुलांना लहानपणापासून शाकाहार द्यावा. आहार एकाकी बदलण्यातही काही धोके असतात. असे अमेरिकन
डायटेटिक असोसिएशनने सूचित केले आहे. तसेच आईचा आहार जर काळजीपूर्वक नियोजित केला नाही, तर तिच्याकडून मुलाला पाजण्यात येणा-या दुधाच्या दर्जावर परिणाम होईल, हेही या संस्थेनं सूचित केलं आहे. विचार न करता शाकाहार आपलासा करणं यात काही धोके आहेत.

न्यूट्रिशननुसार आहार हवा
अ) एकाएकी शाकाहारी बनण्याची हुक्की सहसा तरुण वयात जास्त उपाळून येते. असं पाश्चात्त्य देशात दिसून येते. शाकाहार हेल्दी बनवण्यासाठी त्यात कधी अंडे तर कधी दूध किंवा पनीर, इत्यादींची जोड दिली तर तो फार चांगला आहार होऊ शकतो.
ब) मांसाहारात माणूस अभावितपणे खूप जास्त प्रोटीन खाण्याची शक्यता असते. त्याचा ताण किडनीवर पडतो. हाडांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. शिवाय मांस तयार करण्यासाठी जनावरांना प्रचंड प्रमाणात धान्य खाऊ घालावं लागतं त्यासाठी पाण्याचा वापरही प्रचंड प्रमाणात होतो.
क) अर्थशास्त्र, राजकारण अशाही दृष्टिकोनातून शाकाहार श्रेष्ठ का मांसाहार श्रेष्ठ असे वाद घातले जातात. पण न्यूट्रिशन या विषयानुसार आहाराकडे पाहिलं आणि त्याची योजना केली तर असं दिसतं की तारतम्य राखून ज्या ठिकाणी जे मिळते/ पिकते त्याचा अतिशय काळजीपूर्वक उपयोग करावा. शिवाय आता अन्नपदार्थ आणि शरीर यांच्या परस्पर संबंधांविषयीचे शास्त्रीय ज्ञान उपलब्ध आहे. आयुष्याच्या अनेक अवस्थांमध्ये गरजांसाठी अन्नाचा योग्य उपयोग करावा. हे जास्त चांगले.
लोमा लिंडा युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया लोमा लिंडा युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया इथे इटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ व्हेजिटेरियन न्यूट्रिशन भरली होती. त्यात शाकाहाराचे
पुढील फायदे
*मधुमेहीच्या बाबतीत शाकाहारामुळे किडनी आणि मज्जासंस्था यांचं आरोग्य उत्तम राखण्यात मदत होते.
*मेंदूच्या क्षमतेवर त्याचा चांगला फायदा होतो आणि वाढत्या वयातल्या मुलांचे आरोग्य त्यामुळे चांगले राहते.
*याबरोबरच शाकाहारातले काही तोटे लक्षात आले ते असे.
*दुधाचा वापर टाळल्यास शरीरात कॅल्शियम कमी पडते आणि फ्रॅक्चरचा धोका त्यामुळे वाढतो.
*माशांपासून मिळणारं ओमेगा – ३ हे आरोग्यदायी फॅटी अॅसिड शाकाहारातून मिळत नाही.
>उत्तम प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, आयर्न ही खनिजं यांची गरज प्रामुख्याने असते. ती केवळ भाज्या खाऊन पुरी होत नाही.
>अशा वेळी पदार्थाचे गुणधर्म जाणून घेऊन ते ते अन्नघटक सप्लिमेंट (पूरक) म्हणून घ्यावे.
>अशा त-हेने ज्यांना जाण आहे ते बदलत्या आहारातही आपल्या शरीराचं पोषण उत्तम रीतीनं राखू / करू शकतात.
>ब-याच वेळा केवळ मांसाहाराची मात्रा कमी केल्यामुळेही फायदा मिळून जातो. नाहीतर तरुण वयातही केस गळणे, हार्मोन्सच्या पातळ्या बदलणे, असे प्रकार संभवतात.
>प्रोटीन्सच्या गैरहजेरीत गाजराचा रस घेतल्यास त्वचेवर पिवळेपणा चढतो.
>शाकाहारात बराचसा तंतुमय भाग असतो. यालाच फायबर म्हणतात. हा फायबर अनेक प्रकारचा असतो. यामुळे शरीरात फॅट‌्स कमी येतात. कमी साठतात. हे जरी खरे असले तरी केवळ फायबर घेऊन चालणार नाही. कारण त्यात कॅलरीज नसतात.
>वाढणा-या व्यक्तीला तसेच खेळाडूंना म्हणजेच सतत हालचाल करणा-यांना कॅलरीजची गरज असते.