प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर नेत्रदान इच्छापत्र नोंदणी मोहीम

0
12

मुंबई– भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या बुधवारी दि. १८ मार्च होणाऱ्या वाढदिवसानिमित प्रदेश वैद्यकीय आघाडी आणि असेंट ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमानाने राज्यभरात मरणोत्तर नेत्रदान इच्छापत्र नोंदणी मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेत पक्षाच्या प्रत्येक एक प्रतिनिधी किमान १०० इच्छापत्र जिल्हाध्यक्षामार्फत जवळच्या नेत्र पेढीस भरून द्यावेत असे आवाहन वैद्यकीय प्रकोस्टचे संयोजक डॉ. श्याम अग्रवाल आणि सहसंयोजक डॉ. अजित गोपछडे यांनी केले आहे. या अभियानाची माहिती शहरी आणि ग्रामीण भागातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘ सक्षम ’ या नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे खासदार दानवे लोकसभा अधिवेशनात उपस्थित राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांना राज्यात प्रत्यक्ष भेटून अभिष्टचिंतन करता येणार नाही. त्यामुळे सदस्य नोंदणी महाभियानात तसेच नेत्रदान इच्छापत्र नोंदणी मोहिमेत सहभाग घेऊन कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन डॉ अजित गोपछडे यांनी केले आहे.
संपूर्ण भारतात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम सुरु आहे. संपूर्ण भारतात १ कोटी ९२ लाख अंधाची संख्या आहे. राज्यात २००१ च्या जनगणनेनुसार अंधाची संख्या ५ लाख ८० हजार ९३० इतकी आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अंधांना दृष्टी मिळण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज स्थानिक नेत्रपेढीच्या माध्यमातून भरून घेऊन त्यांच्याकडे सादर करावेत. या कामासाठी असेंट ट्रस्ट मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मोहीम पोहोचणार आहे. यासाठी Android मोबाईलवर ‘ सक्षम ’ – SAKSHAM असे टाईप करून हे अप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.इच्छापत्रात प्रत्येक नेत्र दात्याने मी स्वइच्छेने व स्वयंस्फूर्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहे असे पत्र घेण्यात येते.