राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान उत्पादन वाढीसाठी वरदान

0
12

गोंदिया –जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलप्रवण आणि दुर्गम. या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. योग्य कृषीविषयक सल्ला देऊन त्यांच्या शेतीतून धान उत्पादनात वाढ केली. प्रकल्पातील समाविष्ट गावांमधील शेतकरी आता पारंपरिक धान पीक घेण्याऐवजी आधुनिक धान पीक लागवड करुन उत्पादनात वाढ करीत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत ज्या गावातील धान उत्पादकता कमी आहे परंतू पाण्याची उपलब्धता आहे, अशा गावांमध्ये प्रकल्पाधारित कार्यक्रम राबवून श्री पद्धतीने धान पिकाचे प्रात्यक्षिक दाखवून भरघोस उत्पादन घेणे व तांत्रिक मार्गदर्शनाने सक्षम बनवून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे हा उद्देश ठेवून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील गरारटोला व पालांदूर/ जमी गावांची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रकल्पातील समाविष्ट गावाची सभा घेऊन 162 शेतकऱ्यांच्या 100 हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली. शेतकऱ्यांचे 10 गट तयार करुन त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वेळोवेळी प्रशिक्षण व सभा घेऊन तात्रिक बाबींचे मार्गदर्शन देण्यात आले.

या प्रकल्पातील समाविष्ट गावातील शेतकरी धनलालजी भोयर यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी खते, फवारणी, निंदणी केले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाआधी दरवर्षी धानावर रोगाचा प्रसार होत असे व हातचे पीक जाऊन उत्पादन कमी होत असे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बीजप्रक्रीया केल्याने व वेळोवेळी फवारणी केल्याने धानावर रोगाचा प्रसार कमी होऊन उत्पादनात वाढ झाली. दरवर्षी होणाऱ्या हेक्टरी 20 ते 22 क्विंटल वरुन हे 40.35 क्विंटल एवढे उत्पादन झाले.

पालांदूरचे शेतकरी श्रीराम भोगारे यांनी कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्वप्रथम बुरशीनाशकाने बीजप्रक्रीया केली. गादीवाफे तयार करुन कुजलेला शेणखत, गांडूळ खत व माती मिश्रणाने बियाणांना झाकले व दोनदा पाण्याच्या पाळ्या देऊन एकदा निंदणी केली. दोनदा कोनो विडरणे आडवी-उभी डवरणी केली. त्यामुळे धानपिकाची वाढ जोमाने झाली.

श्रावण सोनुले या शेतकऱ्यांच्या शेतातही प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात आले. कृषी सहायकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी प्रथमच श्री पद्धतीने धानाची लागवड केली. या पद्धतीमुळे एका रोपापासून सरासरी 52 फुटवे मिळाले. त्यापासून 41.25 क्विंटल हेक्टर एवढे धान उत्पादन मिळाले. कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक यांच्या मार्गदर्शनामुळे व राबविण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक योजनामुळे आणि वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सहकार्याने शेतकरी व तरुण पिढी शेतीकडे वळत आहे, हे मात्र निश्चित.