शशी कपूर यांना दादासाहेब पुरस्कार जाहीर

0
9

मुंबईः हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा अभिनेता शशी कपूर यांना जाहीर झाला आहे. शशी कपूर यांना वयाच्या 77 व्या वर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शशी कपूर यांनी 175 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्यासोबतच ते दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा आहेत. स्वर्णकमळ, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शशी कपूर यांचे खरे नाव बलवीर राज कपूर असे आहे. प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. आपल्या वडील आणि भावांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावले. 40च्या दशकात त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. अनेक धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या.
शशी कपूर यांना 2011मध्ये ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. शशी कपूर यांनी दिवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल या चित्रपटातील अभिनयातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना दमदार अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
यापूर्वी प्रख्यात सिनेदिग्दर्शक सत्यजीत रे, अभिनेता देवआनंद, दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा, दिवंगत अभिनेते प्राण आणि गीतकार गुलजार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी सिनेसृष्टीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.