बँकांनी गरिबांचे दुःख जाणावे -पंतप्रधान मोदी

0
11

वृत्तसंस्था
मुंबई – देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे, की कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे. शेतकऱ्यांचे दुःख बँकांनी जाणून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी कठोर भूमिका घेऊ नये. गरिबांबद्दलही बँकांनी अशीच भूमिका घ्यायला हवी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
आरबीआयला 80 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित आर्थिक समावेशन कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन आदी मान्यवर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘ केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्यात बर्‍याच आर्थिक मुद्द्यांवर समान विचारधारा आहे. निधीच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज नाही. देशातील प्रत्येक गरिब व्यक्ति माझ्या कुटुंबातील असून, मी त्यांच्यासाठी काहीतरी मागायला तुमच्याकडे आलो आहे.‘‘
जनधन योजनेबाबत बोलताना मोदी म्हणाले, की पंतप्रधान जनधन योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली, तेव्हा आर्थिक व्यवस्थेला या योजनेमुळे काय क्रांती घडणार आहे याची जाणीव नव्हती. या योजनेअंतर्गत सुमारे 14 कोटी गरिब नागरिकांनी बँकांमध्ये आपली खाती उघडली आहेत. बँकांनी गरिब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे.