टिमवर्क मुळेच राज्यात अव्वल ठरलो -डॉ.अमित सैनी

0
9

गोंदीया, दि.९ : जिल्हाधिकारी म्हणून गोंदिया येथे चांगला प्रशासकीय अनुभव आला. जिल्हयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. रोजगार हमी योजना , थेट लाभार्थ्यांच्या खात्यात गॅस सबसिडी जमा करण्याच्या तसेच महसूल विषयक काही बाबीत आपण राज्यात अव्वल ठरलो .ही किमया अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टिमवर्क म्हणून काम केल्यामुळे शक्य झाली .असे भावनीक उदगार जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (ता.८) बुधवारी डॉ. अमित सैनी यांची बदली कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून झाली त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभात डॉ.सैनी सत्कारमुर्ती म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव्यानेच रुजु झालेले जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी होते. यावेळी डॉ.श्रीमती अंशू सैनी व श्रीमती सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सैनी सत्काराला उत्तर देतांना पुढे म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे काम हे धोरण ठरविणे आणि धोरण ठरविण्यास मदत करणे हे आहे. येथून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बरेच शिकायला मिळाले आहे. कार्यालयातील कामे हे ठरलेल्या वेळेत झाली पाहिजे याकरीता कार्यालयीन शिस्त असणे आवश्यक आह. प्रत्येक फाईल व्यवस्थित हाताळता आली पाहिजे.
जिल्हयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक करुन डॉ.सैनी पुढे म्हणाले , येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मला चांगल्या प्रकारे शिकविले आहे. तहसिलदारांनी सुध्दा चांगले काम केले आहे.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हाधिकारी सुर्यवंशी म्हणाले, डॉ.सैनी यांनी गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामामुळे माझी जबाबदारी निश्चित वाढली आहे. गोंदिया जिल्हाधिकारी हे पद स्व:ताहून मागीतले असल्याचे त्यांनी सांगितले . जिल्हयाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सर्वांच्या सहकार्याने चांगले काय करु असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते मावळते जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांचा भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती सुर्यवंशी यांनी सुध्दा डॉ.अंशू सैनी यांचा भेटवस्तू व शाळ श्रीफळ देऊन सत्कार केला.
जिल्हा पुरवढा अधिकारी प्रशांत काळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर,उपजिल्हाधिकारी सचिन सर्युवंशी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल करकून संजय धार्मिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी , तहसिलदार, नायब तहसिलदार, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी के.एन.राव यांनी केले.संचालन गोंदिया तहसिलदार संजय पवार यांनी तर उपस्थितांचे आभार अपर तहलिरदार रविंद्र चव्हाण यांनी मानले.