यंत्रणांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे- डॉ.अमित सैनी

0
11

गोंदिया : शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला नाही. हा लाभ गरजुपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी व्यक्त केली.

सामाजिक न्याय भवनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले यांची उपस्थिती होती.

डॉ. सैनी म्हणाले, विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यावा. या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच अधिनस्त महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना द्यावी.

श्री. शिवणकर म्हणाले, सामाजिक समता सप्ताहाच्या निमीत्ताने सामाजिक बांधिलकी वाढली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजही समाजात आर्थिक व सामाजिक असमानता आहे. अशाप्रकारची विकृती दूर करण्यासाठी युवकांनी पुढे यावे.

याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष पटले यांनी विचार व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने किराणा दुकान सुरु करण्यासाठी मनोज रंगारी, पुर्णीमा बंसोड, बबिता निकोसे या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक समाजकल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, सूत्रसंचालन श्री.चव्हाण तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामटेके यांनी केले.