डिजिटल क्लासरुमचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

0
12

चंद्रपूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुटाळा येथील पहिल्या डिजिटल क्लासरुमचे उदघाटन अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शाळेला आय.एस.ओ नामांकन प्राप्त झाले असून पालकमंत्री यांच्या हस्ते आय.एस.ओ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी आमदार नाना शामकुळे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, शिक्षण सभापती रोषण पचारे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुरेखा पाटील, ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक राहुल पावडे, सरपंच पपीताताई रायपूरे, गट शिक्षणाधिकारी संध्या दिकोंडवार, मधूसुदन रुंगटा, राजेंद्र गांधी, डॉ.अशोक जिवतोडे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा खुटाळा या शाळेस स्थानिक उद्योग व नागरिक यांच्या सहभागातून डिजिटल क्लासरुम उभारण्यात आली आहे. ही शाळा आदर्श शाळा असून लोकसहभागातून उभा राहिलेला जिल्हा परिषदेमधील हा पहिला उपक्रम आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले, दर्जासोबतच शाळेने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गाव आणि गावातील जनतेने ठरविल्यास किती चांगला विकास होवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे खुटाळा येथील शाळा होय.

शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात वाचलनालय उभारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्‍या विद्यार्थ्यांच्या मुख्य सेवा परीक्षेचा खर्च राज्य शासन करणार आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळा उभारण्यात येणार असून यामुळे देशसेवा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.