आत्महत्याग्रस्त कुटुबियांचे मुख्यमंत्र्यानी केले सांत्वन

0
29

बुलढाणा ता.२१- : संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधला. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर धीर न सोडता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करा, शासन तुमच्या पाठिशी आहे, अशा शब्दात कुटुंबियांना त्यांनी धीर दिला. शासनाच्या विविध योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडणापूर येथील आनंदराव सोनाजी दुधमल या शेतकऱ्याने ऑगस्ट 2014 मध्ये आत्महत्या केली होती. गुरूवारी या कुटुंबियांना भेट देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री भाऊसाहेब फुंडकर, डॉ.संजय कुटे, आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जळगाव जामोदचे नगराध्यक्ष रामदास बोंबटकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर आदी उपस्थित होते.
शेतकरी आनंदराव दुधमल यांची पत्नी नलिनी, मुलगे सुनील, गोपाल, दिनेश तसेच मुलगी पुष्पा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास संवाद साधला. या कुटुंबास सिंचन विहीरीसोबतच शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ देण्याचेही सुचविले.
लाडणापूर येथे गावातील शेतकऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात मुबलक पाणी आहे, परंतु नियमित वीज पुरवठा नाही तसेच ठिबक सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या ऐकून आवश्यक त्या सुधारणा तातडीने केल्या जातील, असे आश्वस्त केले.
शेतकरी कुटुंबास भेट देण्यापूर्वी टुनकी येथे हेलीपॅडवर आगमण झाल्यानंतर तेथेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व्याघ्र प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या चुनखडी येथील नागरिकांना बॅंक पासबूक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. चुनखडी या गावात 225 कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागत असून त्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन लाख 25 हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून त्या खात्याचे पुस्तक गावकरी सुभाष नाथु तडवला, जीवन उर्फ जिवनसिंग सुभाष तडवला, जमुनाबाई गणपत जमरा, लाडकीबाई बदा जमरा, ग्यानसिंग बाथल्या डावर, रमेश छगन चंगळ, जमुनाबाई सहानु मावसकर, गंगाराम सानु कोळसा, रामकिसन गुंगा मावसकर, झिना धनसिंग निगवाल यांना वितरीत करण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी करमोडा येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या शेततळ्याची पाहणी केली. गतीमान पाणलोट विकास योजनेंतर्गत मीनाबाई दिलीप वर्गे यांना शेततळे मंजूर झाले होते. कृषी विभागाने जलयुक्त शिवार व आदर्श ग्राम अभियानातून हे शेततळे केले आहे. तीन हेक्टर क्षेत्र या शेततळ्यातून ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतून होत असलेल्या कामांना गती देण्यासोबतच कामे अधिक दर्जेदार व्हावीत, अशा सूचना कृषी विभागास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.