जलयुक्त शिवारच्या विविध कामाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन

0
13

चंद्रपूर ता.२१- सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या विविध कामाचे भूमिपूजन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.जलयुक्त शिवार अभियानाच्या कार्यक्रमानंतर ग्राम पंचायत कार्यालयात श्री. अहिर यांनी चंदनखेडा सांसद आदर्श ग्राम कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागाने सांसद आदर्श ग्रामसाठी काय नियोजन केले, कामकाज कुठले प्रस्तावित केले व त्या कामाची प्रगती काय याबाबत आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनबादे, उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे, तहसीलदार सचिन कुमावत, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राणे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे, तालुका कृषी अधिकारी पेचे व सरपंच सुमीत मुळेवार उपस्थित होते.
चंदनखेडा येथे कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानात विविध कामे घेण्यात आली आहेत. येथे आज हंसराज अहिर यांच्या हस्ते शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध व नाला रुंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
चंदनखेडा येथील मजगी, ग्रेडेड बंडींग, मजगी पुनर्जिवन, सिमेंट नालाबांध, शेततळे, साखळी सिमेंट नालाबांध, खोलीकरण व रुंदीकरण, बोडी नुतनीकरण करणे असे 260 हेक्टरवर कामे कृषी विभागामार्फत केली जाणार आहे. पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने विहीर पुनर्भरण, साखळी नालाबांध खोलीकरण व रुंदीकरणाची चार कामे करण्यात येणार आहेत. पाटबंधारे विभागामार्फत कालवा दुरुस्ती करण्यात येणार आहे.