धान खरेदी केंद्रावर लूट;साध्या वजनकाट्यावर मोजमाप

0
7

अर्जुनी मोरगाव ता.२२:: एकीकडे आधीच धानाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असताना आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. उन्हाळी धानपिक विक्रीसाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने ठरवून दिलेल्या धान खरेदी केंद्रावरच शेतकर्‍यांना धान विक्रीचे पहिल्यांदाच बंधन घालण्यात आले असल्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यात खरेदी विक्री समिती, विजय कापगते यांचे राईस मिल, लक्ष्मी सहकारी धान गिरणी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नवेगावबांध, महागाव, वडेगाव व धाबेटेकडी या आठ ठिकाणी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत. धान खरेदी केंद्रांना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. मागील खरीप हंगाम धानखरेदीपर्यंत या वजनकाट्यांचा वापर करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या धान खरेदीसाठी साध्या वजनकाट्यावरच मोजमाप केलेले परवडते. इलेक्ट्रानिक्स वजनकाट्यावर अधिकचे धान लुटण्याची सुविधा नसते. यासाठी चार्र्जींगची समस्या सांगून धान खरेदी करणार्‍या संस्था हेतू पुरस्सर इलेक्ट्रानिक्स वजनकाट्याचा वापर टाळतात. अर्जुनी मोरगाव येथील धान खरेदी केंद्रावर मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या डोळ्यादेखत ४0 किलो ऐवजी ४१ किलो वजन ठेवून मोजमाप केले जात आहे. याशिवाय बारदानाच्या मोबदल्यात बारदानाऐवजी पोते मांडून वजनकाटा केला जात असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. बारदान्याचे वजन ६00 ग्रॅम असते तर पोत्याचे वजन एक किलोवर असते. यात सुद्धा ४00 ग्रॅमपेक्षाही अधिक वजन दर ४0 किलोमागे घेतले जाते, अशी ओरड आहे. या व्यतिरिक्त वजन करत असताना झुकते माप घेतले जात असल्याची तक्रार आहे. दररोज संध्याकाळी धान खरेदी बंद झाल्यानंतर प्रत्येक पोत्यांचे वास्तविक वजना करुन उर्वरित धान काढले जातात. हा अतिरिक्त लाभ असल्याचे समजते. दैनंदिन या प्रक्रियेत संस्थांना मोठा आर्थिक लाभ होत असल्याच्या चर्चा आहेत.
धान विक्रीसाठी तालुक्यातील सर्वच गावांची आठ धान खरेदी केंद्रात समावेश असलेली गावनिहाय यादी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आली आहे. यापूर्वी कोणत्याही गावच्या शेतकर्‍याला आपल्या सोईनुसार नजीकच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीची मुभा होती. मात्र आता ठराविक केंद्रावरच विक्री करावयाची असल्याने शेतकर्‍यांची अडचण होत आहे. दर एकरी १0 क्विंटल धान खरेदी केंद्रामार्फत सातबाराच्या उतार्‍यावर घेतले जातात. परंतु १५ ते २0क्विंटल प्रमाणे धान खरेदी केले पाहिजे असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. कामाच्या मोबदल्यात मजूरवर्ग हा शेतकर्‍यांकडून धान घेत नाही. त्ळाल रोखट मजुरी द्यावी लागते. तरी सुद्धा शासन दर एकरी १0 क्विंटलच शेतकर्‍यांकडून धान खरेदी करतो.त्यामुळे अधिकच्या उत्पादित धानाला व्यापार्‍यांकडे कवडीमोल भावात विक्री करावे लागत आहे.