भंडार्‍यात वैनगंगा महोत्सव होणार -खासदार नाना पटोले

0
9

भंडारा ता.२२:: देशात भंडार्‍याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी वैनगंगा महोत्सवाचे नोव्हेंबर महिन्यात आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणारा असेल असा विश्‍वास खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.या महोत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येईल. या बैठकीत नागरिकांच्या सूचना मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांना कधी दुष्काळ तर कधी अतवृष्टी, अवकाळी पाऊस यांचा सामना करावा लागतो. मात्र १९३७ च्या धोरणानुसार ५0 टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याशिवाय शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. विमा कंपन्यासुध्दा कायद्यावर बोट ठेऊन भरपाई देण्याच्या टाळत होत्या. ही बाब याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर केंद्राने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली. यामुळे किमान ३३ टक्के पिकांचे नुकसान झाले तरी शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहे.
वाईल्ड लाईफ अँक्टमधील शेड्युल तीन मध्ये येणारे हरीण, रानडुक्करे, रोही हे प्राणी अन्य हिस्त्र प्राण्यांची अन्न आहे. त्यामुळे त्यांची शिकार करता येत नाही. परंतु त्याच कायद्यातील प्रावधानानुसार अशा तृणभक्षक प्राण्यांची संख्या अधिक वाढल्याने शेतकरी आणि मानवी जीवनाला धोका निर्माण झाल्यास शेड्युल पाचनुसार या वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची मुभा दिली जावू शकते मात्र आतापर्यंत त्याचा वापर राज्यात कधीही केला नाही.
वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान ज्या प्रमाणात केले जाते त्या प्रमाणात वनविभागाकडून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थाई समितीकडून पावसाळी अधिवेशनात संसदेत होणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानीसाठी योग्य मोबदला मिळू शकेल, अशी आशा पटोले यांनी व्यक्त केली.
मुंढरी-रोहा आणि नांदेड-विलम पुलांसाठी १७५ कोटी
मागील अधिवेशनानंतर भंडारा जिल्ह्यात केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत वैननंगा नदीवरील दोन नवीन पुलाच्या बांधकामासाठी १७५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात मोहाडी तालुक्यातील मुंढरी-रोहा मार्गावर ६0 कोटी रुपयांचा तर लाखांदूर तालुक्यातील नांदेड-विलम (पवनी) मार्गावर ११५ कोटी रुपयांचा पुल होणार आहे.