‘ब्ल्यू मॉरमॉन’ राज्य फुलपाखरू

0
26

नागपूर दि. २३-निसर्गप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या फुलपाखराला (राणी पाकोळी) ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. राज्याच्या इतर मानचिन्हांमध्ये आतापर्यंत फुलपाखरू नव्हते. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वपूर्ण घटक व वनस्पतीसह परस्परसंबंध असलेला महत्त्वपूर्ण कीटक आहे.

राज्यात फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. देशात कोणत्याही राज्याने राज्य फुलपाखरू घोषित केलेले नाही. फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता.