माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

0
9

मुंबई- माजी सहकार राज्यमंत्री व सोलापूरचे माजी खासदार प्रतापसिंह मोहिते-पाटील (वय 65) यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षापासून ते आजाराशी लढा देत होते. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते धाकटे बंधू होत.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते-पाटील घराण्याला राज्याच्या राजकारणात मोठे स्थान आहे. माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह यांच्या नेतृत्त्वाखाली प्रतापसिंह यांनी राजकारणात प्रवेश केला. 1985 साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. 1997 साली ते गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने विधान परिषदेवर निवडून गेले व सहकार राज्यमंत्री बनले. त्यानंतर 2002-03 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडली. त्यावेळी केंद्रात वाजपेयी सरकार होते. मोहिते-पाटील घराण्याचे सोलापूर जिल्हात वर्चस्व असल्याने प्रतापसिंह यांनी माजी मंत्री अनंत देवकते यांचा 1,22,817 मतांनी विक्रमी पराभव केला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले उपमुख्यमंत्री बंधू विजयसिंह यांनी मदत केल्यानेच देवकते यांचा पराभव झाल्याचे सांगितले गेले होते.
मात्र, 2004 सालानंतर केंद्रातील वाजपेयी सरकार जाताच प्रतापसिंहांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला व विधान परिषदेवर निवडून गेले. यानंतरच्या काळात मात्र ते राजकारणापासून दूर फेकले गेले. याच नैराश्यातून 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शरद पवारांनाच आव्हान दिले होते. अखेर बंधू विजयसिंह यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करून त्यांना पवारांच्याविरोधातून अर्ज मागे घेण्यास पाडले होते. तरीही त्या काळात विरोधकांच्या दावणीला जात प्रचारादरम्यान त्यांनी बंधू विजयसिंह व पवारांच्याविरोधात गरळ ओखली होती.
2014 साली तर लोकसभा निवडणुकीत प्रतापसिंह यांनी थोरले बंधू विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधातच निवडणूक लढविली. मात्र, कोणतीही वैचारिक भूमिका स्पष्ट नसल्याने त्यांच्यापासून कार्यकर्ते दुरावले होते. अखेर बंधू विजयसिंह यांनी मोदी लाटेतही 25 हजार मतांनी विजय खेचून आणला. प्रतापसिंह मोहिते-पाटलांना योगायोगाने जेमतेम 25 हजारच मते पडली होती. या काळातही ते आजारीत होते. त्यांची प्रकृती संपूर्णपणे ढासळली होती. मात्र, वर्षभरात त्यांचा आजार बळावला व अखेर आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते-पाटील विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेले आहेत.