तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

0
17

पुणे दि. ८– देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बुधवारी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. तुकोबांची पालखी भजनी मंडपाच्या बाहेर येताच वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भक्तीच्या रसात बुडालेले वारकरी पावसाने चिंब झाले. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी, पिकांबरोबरच शेतक-यांचे चेहरेही सुकून गेले होते. मात्र, पावसाचे आगमन झाल्याने वारक-यांसह शेतक-यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. देहूतून संत तुकोबांची पालखी बाहेर पडून इनामदार वाड्यात विसावेल. पालखी प्रस्थान व तुकोबाच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, प्रस्थानाआधी पहाटे साडेचारपासून सुरू विधी सुरु झाले होते. वारीच्या ओढीने लक्षावधी वारक-यांचा मेळा देहू-आळंदीत भरला होता. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्या हस्ते पादूका पूजन झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवधन पाटील, बबनराव पाचपुते, माजी आमदार उल्हास पवार, देहूनगरीचे सरपंच कांतिलाल काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
330 वा सोहळा आणि दिंड्याही 330च
संस्थानचा यंदा 330 वा पालखी सोहळा असून, 330 च दिंड्यांचा समावेश केला आहे. मंगळवारपर्यंत राज्याच्या कानाकाेप-यातून वारकरी देहूत दाखल झाले आहेत.
असा असेल आजचा सोहळा
पहाटे साडेचार : देऊळवाड्यात काकड आरती झाली

पहाटे साडेपाच : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा झाली
सहा वाजता : संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली
साडे सहा वाजता: वैकुंठस्थान मंदिरात महापूजा झाली
सात वाजता : विश्वस्तांच्यावतीने महापूजा झाली
आठ ते नऊ : गाथाभजन, मंदिर प्रदक्षिणा झाली
नऊ ते अकरा : संभाजी महाराज देहूकरांचे काल्याचे कीर्तन
बारा ते दोन : महाप्रसादाचा कार्यक्रम
दोन वाजता : तुकोबांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंदिरात
तीन वाजता : पालखी प्रस्थानाला प्रारंभ; दिंडीप्रमुख, मानकऱ्यांचा सत्कार
तीन वाजून 40 मिनिटांनी पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
सायंकाळी साडेसात पर्यंत मिरवणुकीनंतर पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यात.