संपूर्ण विदर्भाचा भंडारा-गोंदिया व्हायला वेळ लागणार नाही – उद्धव ठाकरे

0
9

मुंबई, दि. ८ – ‘ सरकारने समाजमन ओळखून वेळीच पावलं न उचलल्यास संपूर्ण विदर्भाचा भंडारा- गोंदिया व्हायला वेळ लागणार नाही’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला हाणला आहे. विदर्भातील भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची धूळधाण उडाल्यानंतर याच मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला ‘सामना’च्या अग्रलेखातून लक्ष्य केले.
‘१५ जूनपर्यंत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामा वगैरे होऊन त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नाही, या कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्‍यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ व्हायला वेळ लागणार नाही’ असा इशारा त्यांनी दिला. ‘ भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून विदर्भातील खदखद बाहेर पडली आहे’ असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भाचा संपूर्ण कौल शिवसेना- भाजपाच्या बाजूने होता. खासकरून विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने उभा राहिल्यानेच भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसला. पण त्याच विदर्भातील पहिल्या महत्त्वाच्या निवडणुकीने भाजपास धक्का दिल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. भंडारा आणि गोंदियातील जनतेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला स्वीकारले, याचा कोणी काय घ्यायचा तो अर्थ घेऊ द्या, पण महाराष्ट्रासाठी हे लक्षण बरे नसून हा शुभशकून नव्हे. या पराभवासाठी कोणतीही कारणे देता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.