दिंडोरी येथे अंडरपास व उड्डाण पूल कामास तत्वत: मंजूरी; ११५ कोटींच्या निधीची तरतूद: डॉ. भारती पवार

0
17

नाशिक, दिनांक 9 नोव्हेंबर, : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पूल व अंडरपासच्या कामास तत्वत: मान्यता दिली असून त्यासाठी 115 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती
पवार यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) नाशिक विभागाची बैठक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या नाशिक येथील कार्यालयात संपन्न झाली. याबैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील, आयएसटीपीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चांदवड येथील टी जंक्शन, रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना पादचारी मार्ग, मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या, मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीचे ठिकाणे त्याचप्रमाणे जऊळके, वणी व चांदवड येथील अपघात प्रवणक्षेत्र याबाबींची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उड्डाण पूल व अंडरपास होण्यासाठी डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कामे लवकर सुरु करण्यात यावीत आणि कामे दर्जेदार व गुणवत्‍तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक विभागास 2022-23 या वर्षाकरिता रस्ते व पुलाच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी दिंडोरी येथील चांदवड जंक्शन 59.42 कोटी तर जऊळके वणी येथे उड्डाण पूल व अंडरपाससाठी 55.52 कोटी निधीची तरतूद करण्यात आहे, अशी माहिती यावेळी
विभागाचे प्रकल्प संचालक श्री साळुंखे यांनी दिली.