भाजपची घसरण पीडादायी-सेना

0
11

मुंबई – नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकांसह  काही ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र स्वरूपाचे लागले आहेत. भाजपला अनेक ठिकाणी अस्तित्वासाठी झगडावे लागत असेल तर हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येतीलच असे नाही. शिवसेनेने मात्र या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र, भाजपची झालेली घसरण आमच्यासाठी पीडादायी आहे. भाजप आमचा फार जुना मित्रपक्ष आहे, अशा शब्दांत राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत निकालावर शिवसेनेने ‘सामना‘च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘राज्यात बदलाचे वारे इतक्या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते.  पण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपची जी दाणादाण झाली तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या कॉंग्रेस पक्षाला लोकांनी उचलून आपटले होते, त्या कॉंग्रेस पक्षाची मूर्च्छितावस्था जाऊन तरतरी यावी, असेचे काहीसे निकाल लागले आहेत. ‘ तसेच “पंचायती, जिल्हा परिषदांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राचे जनमानस नाही, असे खुलासे आता होतील. पण त्या लपवाछपवीस अर्थ नाही. केंद्रात भाजपचे राज्य एकहाती आल्यापासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आलाच होता, हे विशेष. इतकेच काय, देशातील प्रमुख विद्यापीठे व शैक्षणिक संकुलांतही भाजपने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच रोहित वेमुलाची आत्महत्या झाली व कन्हैयाकुमारचा जन्म झाला. हेच यश मानायचे असेल तर शत-प्रतिशत मार्गी लागले असे म्हणायला जागा आहे.‘ अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.