पत्रकारांसाठी शासनाच्या अनेक उपयुक्त योजना – माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

0
17
संगमनेर (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे व वाचकांच्या गरजेनुसार प्रसारमाध्यम क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून या बदलाचा स्विकार करून प्रयत्न करणारी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व पत्रकार टिकतील असे प्रतिपादन दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी केले. अनंत पाटील पुढे म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत असला तरी प्रिंट मिडीया बंद पडणार नाही मात्र त्याचे स्वरूप बदलेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करणारी व्यक्तीच पत्रकार म्हणून आपले करीयर यशस्वी करू शकेल. वास्तवाचे भान, तंत्राचे ज्ञान आणि अभ्यासाची जाण असणार्‍या व्यक्तीचे भवितव्य पत्रकारिता क्षेत्रात उज्ज्वल आहे. मोठ्या शहरातील भांडवली प्रसारमाध्यमांवर काही मर्यादा आल्याने ग्रामीण भागातील संघटीत व छोट्या वृत्तपत्रांना उत्पन्नवाढीची फार चांगली संधी आहे. प्रिंट मिडीयाचे स्वरूप बदलेल मात्र त्याच्या अस्तित्त्वाला धोका नाही.
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई शाखा संगमनेर या संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार मार्गदर्शन शिबीरात श्री. पाटील बोलत होते. दैनिक युवावार्ताच्या सभागृहात संगमनेर, अकोले, जुन्नर, राहाता, राहुरी या तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने शिबीरासाठी उपस्थित होते. या शिबीरास मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव गुंदेचा, संस्थेचे उपाध्यक्ष जवाहर मुथा, समाजसेविका बेबीताई गायकवाड, दै. युवावार्ताच्या संपादिका सुशिला हासे इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी केले. पत्रकार मार्गदर्शन शिबीराचा उद्देश, पत्रकारांचे प्रश्‍न व संघटनेचे महत्त्व इ. माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला.
माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी राज्यातील पत्रकारांसाठी शासनाचे सतत सहकार्याचे धोरण असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी अधिस्विकृती पत्रिका, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, पत्रकार आरोग्य योजना, पत्रकारांसाठी सवलतीचे दरातील गृहयोजना या योजनांची माहिती दिली. पत्रकारांसाठी पेन्शन व पत्रकार हल्लाविरोधी कायदा शासनाचे विचाराधीन असून कायद्याचा मसूदा तयार झाला असून राज्यातील पत्रकारांचे सर्वेक्षणही सुरू झाले आहे. लवकरच पत्रकार पेन्शन योजना व संरक्षण कायदा पत्रकारांसाठी लागू होईल अशी माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव गुंदेचा यांनी सांगितले की, पत्रकारांच्या व वृत्तपत्र मालकांच्या राज्यात अनेक संघटना आहेत. समाज प्रश्‍नांसाठी व सामुहिक शक्तीसाठी एकत्रीत येऊन शासनाशी समन्वय साधावा असे आवाहन पत्रकारांना केले. पत्रकारांमध्ये प्रत्यक्ष काम करणार्‍यांपेक्षा, पत्रकारितेचे ढोंग करणार्‍यांचा रूबाब जादा असतो असा चिमटाही गुंदेचांनी घेतला. राज्यातील वृत्तपत्रे व पत्रकार संघटनांच्या प्रश्‍नांसाठी सक्रीय कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला.
या शिबीरातील गौरवमूर्ती प्रा. जवाहर मुथा, समाजसेविका बेबीताई गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित पत्रकारांनी पाहुण्यांना विविध प्रकारच्या शंका विचारल्या, अडचणींची माहिती दिली.
पत्रकारिता प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी नरेंद्र लचके, जयंत देशपांडे, प्रसाद सुतार, सी न्यूज वृत्तवाहिनी टीम, नारायण दहे, संजय अहिरे, प्रा. आनंद हासे, प्रा. सुदीप हासे, उत्तम भोसले, अमोल भागवत, राहूल पंडीत यांनी विशेष प्रयत्न केले. प्रभावी वक्ते निलेश पर्बत यांनी सुत्रसंचालन केले. संस्थेचे राज्य समन्वयक नरेंद्र लचके यांनी आभार प्रदर्शन करून मार्गदर्शन शिबीराची सांगता झाली.