ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वणवा

0
10
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर-दि.2- विदर्भात सर्वत्र सूर्य आग ओकत असतानाच चंद्रपूर शहर आणि आसपासचे तापमान ४५ डिग्री आणि अधिक होत चालले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जंगलाच्या वणव्यात होत आहे. जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात लागलेल्या आगीने वन्यजीव संकटात आले असून वनविभागाचे प्रयत्न  आग आटोक्यात आणण्यात कमी पडत आहेत.  ताडोबाच्या बाह्य भागात असलेल्या जुनोना जंगलात वणवा पेटला असून मोठे जंगल क्षेत्र या वणव्यात होरपळून निघाले आहे. या भागातील इरई नदीच्या बॅक वॉटर आणि अन्य पाणवठ्यावर मोठी जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात. या आगीतून मोठे प्राणी स्वतःची सुटका करून घेतात मात्र छोटे प्राणी यात होरपळतात. अशातच हा वणवा नियंत्रित करण्याची जबाबदारी वनविकास महामंडळ या यंत्रणेकडे आहे मात्र, या यंत्रणेकडे आग विझविण्यासाठी तोकडी यंत्रणा आहे. केवळ १२ वनमजूर हातात झाडाच्या फांद्या घेऊन आगीच्या मार्गात येणारा पाचोळा दूर करत आहेत. या पद्धतीने ही आग विझविण्यासाठी कित्येक दिवस लागण्याची शक्यता आहे. मात्र तोवर या बहुमुल्य जंगलाचे अतोनात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. अधिकारी मात्र केवळ आग कशी विझविली जाते याचे स्पष्टीकरण देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या भूभागावर वनसंपदा आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणवा विझविण्यासाठी योग्य यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ नसणे मोठी चिंतेची बाब आहे.