शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या, अन्यथा ‘चांदा ते बांदा’ आंदोलन

0
9

मुंबई- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार हे आजपासून दोन दिवसाच्या (6 ते 7 मे) मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात ते दुष्काळग्रस्त बीड, नांदेड, लातूरसह अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांची भेट घेऊन संवाद साधत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये 16 मे रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळ परिषदेत औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ‘राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या’ माध्यमातून 15 हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार आज व उद्या दुष्काळी दौरा करीत आहेत.

युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते, त्याचे सकारात्मक परिणामही दिसले होते. या सरकारने हे ध्यानात घ्यावे. या सरकारने केवळ व्याज माफ करून चालणार नाही तर संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे नाहीतर आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलन करू असा इशारा अजित पवारांनी दिला.ते पुढे म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी सरकारने पाण्याचे नियोजन गेल्या ऑक्टोबर महिन्यातच करणे गरजेचे होते, ते न झाल्याने आज टँकर व रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली आहे.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी हेदेखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.