शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैव – जोगेंद्र कवाडे

0
7

नांदेड दि.12- फुले-शाहु-आंबेडकरांच्या नावाने महाराष्ट्र राज्य पुरोगामी असल्याचा टेंभा मिरविण्यात येतो. तर भारत देश कृषी प्रधान असल्याचे सांगण्यात येते, परंतु आज या कृषी प्रधान देशातच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत नसल्याबाबतही त्यांनी खेद व्यक्त केला. 

बी.आर.फाऊंडेशनच्या वतीने आज आयोजित कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रा.जोगेंद्र कवाडे नांदेड येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करुन त्यांच्यावरील संकट दूर करावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. हा प्रश्न नागपूर, मुंबई अधिवेशनात मांडण्यात आला होता, परंतु शासनाने अद्याप कर्जमुक्तीची घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची असताना देखील सरकार ही जबाबदारी उचलण्यास तयार नाही. कर्जमुक्तीऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु कर्जाचे पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्याचे आजचे मरण उद्यावर ढकलणे असेच असल्याचे प्रा.जोगेंद्र कवाडे म्हणाले. या पत्रकार परिषदेस पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे, जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, मोहन गर्दनमारे, कुलदीप चिकाटे आदींची उपस्थिती होती.