विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान,मंत्रीमंडळाने पुसली तोंडाला पाने

0
9

मुंबई- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये आज घेण्यात आला. मागील 15 दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानासह राज्यातील विविध शहरांच्या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षकांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पडले आहे. या निर्णयामुळे राज्यातील 1600 हून अधिक शाळांना तर 2400 हून तुकड्यांना फायदा होणार आहे. तसेच सुमारे 19 हजार शिक्षकांना आता सरकारी पगार सुरु होणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर 163 कोटींहून अधिक रूपयांचा भार पडणार आहे.हा निर्णय म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखा ठरला आहे.गेली 10-15 वर्ष काम करुन आता 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा म्हणजे गळचेपीच होय.एका शिक्षकाचा मृत्यु होऊनही 100 टक्के अनुदान न देता 20 टक्यावर मंत्रीमंडळाने बोळवण करुन पुन्हा या शिक्षकांवर अन्याय केला आहे.
महाबीजच्या बियाणांच्या दरवाढीला स्थगिती-
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना महाबीजने खरीप हंगामाच्या बियाण्यांमध्ये मोठी दरवाढ केली होती. या दरवाढीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाबीजच्या दरवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, आता दरवाढ टळली आहे.

सोयाबीन, तूर, उडीद, मुग व सर्व कडधान्य बियाणांच्या किंमती महाबीजने भरमसाढ वाढ केली होती. सोयाबीन बियाणांचा जेएस-335 या वाणाची 30 किलोच्या पिशवीची किंमत 1875 रुपयांवरून 2040 रुपये इतकी केली होती. मुगाच्या कोपरगाव वाणाच्या किंमतीत किलोमागे 75 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर उत्कर्ष वाणाच्या 5 किलोमागे 300 रुपयांची वाढ करण्यात आली होती. उडीदाच्या टीएयू-1 या वाणाच्या 5 किलोमागे 600 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तूरीचा आयसीपी 8863 हा वाण प्रति किलो 80 रुपयांनी महागला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने ही दरवाढ शेतकर्‍यांवर अन्यायकारक आहे. राज्य सरकारची ही कृती शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप शेतक-यांसह विरोधकांनी केला होता. अखेर राज्य सरकारने ही दरवाढ स्थगित केली आहे.