गोंडवाना विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीत घोळ?

0
5

गडचिरोली, ता.१४: गोंडवाना विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, निवड झालेल्या प्राध्यापकांची नावे यादी लागण्यापूर्वीच सार्वजनिक झाल्याने घोळ झाला असण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.
गोंडवाना विद्यापीठाने २७ ऑगस्ट २०१५ रोजी जाहिरात प्रकाशित करुन गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, वाणिज्य व इतिहास अशा पाच विषयांतील सहायक प्राध्यापकांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले. पुढे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर २६ एप्रिल २०१६ ते १ जून २०१६ या कालावधीत पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मुलाखत, शिकविण्याचे प्रात्यक्षिक व अन्य बाबी आटोपण्यात आल्या. अंतिम प्रक्रिया आटोपल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची नावे लिफाफ्यात बंद करण्यात आली. मात्र नावे लिफाफ्यात बंद असतानाही निवड झालेल्या उमेदवारांची नावे संबंधितांपर्यंत पोहचली. पुढे ही नावे विद्यापीठाशी संबंध असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आणि मीडियालाही कळली.
मुलाखतीसाठी विषयतज्ज्ञांची निवड व्यवस्थापन समितीच्या सभेत केली जाते. परंतु आम्ही म्हणू तेच विषयतज्ज्ञ हवेत, असा अट्टाहास समितीच्या काही सदस्यांनी धरल्याने चक्क दोन वेळा समितीच्या बैठका रद्द कराव्या लागल्या. समितीच्या तिसऱ्या बैठकीत याच दबंग सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनावर दबाव आणून आपल्या मर्जीतील विषयतज्ज्ञांच्या नावांना संमती मिळवून घेतली, अशी चर्चा आहे