मुख्यमंत्र्यासोबतची बैठक फिस्कटली, विशेष शिक्षकांचे आंदोलन सुरूच

0
34

नागपूर/मुंबई, दि. 20- केंद्र सरकार पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांचे सरकारविरोधातील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही सुरूच राहणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक फिस्कटल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अपंग समावेशित शिक्षण योजना विशेष शिक्षक कृति समितीने घेतला आहे. समितीचे कार्यकारिणी सदस्य विजय कदम यांनी सांगितले की, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी कृति समितीच्या आंदोलनाला सोमवारी पाठिंबा दिला. शिवाय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घडवून दिली. मात्र विशेष शिक्षकांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे असमाधानी असलेल्या शिक्षकांनी मंगळवारीही आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये कृति समितीच्या शिक्षकांनी मुंडन केल्याचे कदम यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही तोडगा निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
शासनाला १० दिवसांची पूर्व सूचना देऊन व धरणे आंदोलनाससुरवात झालेली असताना सुद्धा शासन व प्रशासन विशेष शिक्षकांच्या प्रश्नांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. ३१ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्त व शिक्षण संचालक व शिक्षण उपसंचालक यांच्याद्वारे आदेश व पदमान्यता प्राप्त कायम सेवेतील विशेष शिक्षकांना ७ जुलै २०१५ च्या शासन परीपत्रीकेद्वारा नोकरीमधून बेदखल करण्यात आलेले आहे. आपल्या हक्कांसाठी वारंवार आंदोलन केल्यानंतर २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समायोजनाचे आश्वासन वारंवार दिले. परंतु कृती मात्र केली नाही. शासन आपल्या बाबतीत वेळ मारून नेत असल्याचे विशेष शिक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी राज्यव्यापी धरणे आंदोलनास सुरवात केली आहे. आता समायोजन प्राप्त केल्याशिवाय आंदोलनाची भूमी सोडायची नाही असा पक्का निर्धार विशेष शिक्षकांनी केला आहे. मात्र सहा दिवस होऊनही सरकार याची दाखल घेत नसल्याने आज या शिक्षकांनी मुंडण आंदोलन केले.