क्रांतिदिनी केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या

0
8

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्‍वासन भाजपने दिले. स्वतंत्र विदर्भ हा केंद्राच्या अखत्यारित येतो. केंद्राने ठरविले तर उद्याही विदर्भ होऊ शकतो. मात्र, सत्तेत आल्यावरही हे सरकार स्वतंत्र विदर्भाबाबत निर्णय घेण्यास मागेपुढे बघत आहे. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात विदर्भातील शेकडो समर्थक सहभागी होणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले यांनी रविवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे युवकांची कार्यशाळा पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्पादनावर आधारित हमीभाव, कर्जमुक्ती, भारनियमन यासह अन्य प्रश्‍नांचा जाब केंद्रीय मंत्री गडकरी यांना ठिय्या आंदोलनादरम्यान विचारणा येणार असल्याचेही नेवले यांनी सांगितले. 2 आणि 3 ऑक्‍टोबरला विदर्भाची विधानसभा नागपुरात भरविली जाणार आहे. त्यात विदर्भ वेगळा झाल्यास विकास, विदर्भ सक्षम कसे होईल, याची माहिती दिली जाईल. मागील वर्षी अशी विधानसभा भरविण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात केवळ विदर्भाची विधानसभा भरवावी, या दृष्टीने समिती आंदोलनाच्या रूपात काम करेल. 26 जूनला युवकांचा मोठा मेळावा यवतमाळ येथ होत आहे. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप, नागपूर विभागाचे सचिव भागवत, अरविंद देशमुख, ऍड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, गोपी मित्रा, प्राचार्य ठाकूरवार, किशोर पोतनवार उपस्थित होते.