मच्छीमार सहकारी संस्थांमधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार

0
13

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याच्या बंद पडलेल्या १४ मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी विशेष तपास समितीमार्फत करावी, अशी मागणीही कृती समितीचे अध्यक्ष दामोदार तांडेल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

मस्त्य आयुक्तालयात काही अधिकारी एकाच जागेवर गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असल्याचा दावा तांडेल यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारात समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बंद पडलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांसोबत संबंधित अधिकाऱ्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भ्रष्टाचार झालेल्या संस्थांमध्ये राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेवर तांडेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. तांडेल यांनी सांगितले की, एन.सी.डी.सी. योजनेतून संस्थेला ३० मार्च २००९ रोजी बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये निधी मिळाला होता. मात्र निधी मिळाल्यानंतर संस्थेने बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारलेच नाही. या

संस्थेच्या ३० मासेमारी यांत्रिक नौकांना प्रत्येकी ३९ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. २००६-०७ दरम्यान संस्थेला संपूर्ण निधी मिळाला. मात्र निधी मिळाल्याच्या ९ वर्षांनंतरही नौका बांधलेल्या नाहीत. याप्रकरणात एकूण ११ कोटी ८४ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.