महिला तस्करी रोखण्यासाठी सर्व स्तरांतून पुढाकार आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

0
10

मुंबई, दि. 27 : महिलांची तस्करी हा जगातील दुसरा सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय आहे. शिवाय पुढील 10 वर्षात हा व्यवसाय अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे जाऊन जगातील सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती आहे.कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला रोखावे लागेल. यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करुन महिला आयोग, इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्यासह जगातील विविध देशांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला तस्करी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसाच्या या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.उद्घाटन प्रसंगी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे,अभिनेता अक्षय कुमार, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे सीईओ गॅरी हॉगेन, सेकंड लेडी ऑफ घाना हाजीया समीरा बाऊमिया उपस्थितीत होत्या. जुहू येथील जे डब्लू मॅरियेटमध्ये 27 व 28 जुलैला होणाऱ्या या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे विविध देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी तस्करीत आतापर्यंत फक्त गरिब, वंचित घटक फसत होते. पण आयटी तंत्रज्ञानाच्या काळात आता सधन, सुशिक्षित घरातील मुलीही फसल्या जात आहेत. यातील गुन्हेगार हे आयटीमधील मास्टर असतात.त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आपल्यालाही तितक्याच प्रभावी उपाययोजना व आयटीचा फार प्रभावी वापर करावा लागेल. महिलांच्या तस्करीचा गुन्हा राज्य आणि देशांच्या सीमा भेदून केला जातो. त्यामुळे हे रोखण्यासाठी सर्व देशांचा एकत्रित पुढाकार महत्वाचा आहे. तसेच यातून सुटका झालेल्या महिलांचे चांगले पुनर्वसन होणे गरजेचे आहे. मानसिक समुपदेशन होऊन त्या मूळ प्रवाहात सामिल होईपर्यंत आपणास प्रयत्न करावे लागतील.मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मानवी तस्करीचे प्रमाण अधिक आहे, तिथे ते रोखण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्यात आले आहेत.

महिलांची तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र यावे -मंत्री पंकजा मुंडे

महिलांची वाढती तस्करी हा जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय आहे,आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन ही तस्करी रोखण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.महिलांवर होणारे वाढते अत्याचार आणि तस्करी यावर परिषदेच्या माध्यमातून विविध देश एकत्र आल्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महिलांच्या समस्या जगभरात सारख्याच आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी 124 देश एकत्रितपणे लढा देत आहेत, असे असले तरी तस्करी, सामुहिक बलात्कार,अत्याचार यावर कडक व ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अत्याचार झालेल्या महिलांना समाज सहजासहजी स्विकारत नाही, त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत देखील परिषदेच्या माध्यमातून उपाय योजले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी ‘दिशा परिवर्तनाची’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.