नक्षल्यांचे बॅनर जाळून नागरिकांनी केला शहीद सप्ताहाला विरोध

0
12

गडचिरोली,दि.२७: सावरगाव-गॅरापत्ती रस्त्यावर शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर जाळून नागरिकांनी शहीद सप्ताहाला विरोध दर्शविला आहे.दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या कालावधीत ते ठार झालेल्या नक्षल्यांचे स्मारक उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. त्यासाठी नक्षली ठिकठिकाणी बॅनर लावून लोकांना शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करतात. असेच बॅनर धानोरा तालुक्यातील मरकेगाव परिसरातील सावरगाव-गॅरापत्ती रस्त्यावर बांधण्यात आले होते. मात्र, परिसरातील गावकऱ्यांनी नक्षल्यांनी बांधलेले बॅनर जाळून शहीद सप्ताहाला आपला विरोध असल्याचे दाखवून दिले. आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले? आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळुन आमचा विकास का थांबवायचा?, असे परखड सवाल करत गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात, अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही, असा निर्धार दुर्गम भागातील गावकऱ्यांनी केला आहे. ज्या मरकेगाव भागात २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवुन १५ पोलिस जवानांना ठार केले, त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांना विरोध होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
नक्षल सप्ताहाला विरोध म्हणून मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील काही गावांतील नागरिकांनी त्यांच्याकडे असलेलh शस्त्रs पोलिसांकडे जमा केली. मालेवाड्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अजित कणसे, दुय्यम प्रभारी अधिकारी दीपक वारे, रामदास जाधव यांनी ग्रामभेटी व नक्षलविरोधी अभियानादरम्यान नागरिकांना भरमार बंदुका जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळेगाव व खांबाळा येथील नागरिकांनी १ डबल बोअर रायफल, ३ भरमार बंदुका व ३ भरमार बंदुका बॅरल पोलिस मदत केंद्रात जमा केल्या. यापूर्वी गावकऱ्यांनी ६ भरमार बंदुका व ४ भरमार बॅरल जमा केले होते, हे येथे उल्लेखनीय.