वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ द्या – विखे पाटील

0
8

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )दि.27 – दुष्काळाने होरपळलेल्या अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश आज विधानसभेत सरकारला देण्यात आले.
काँग्रेसने हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी निर्माण होत असलेल्या अडचणी सभागृहात विषद केल्या. या योजनेसाठी सरकारने जाचक नियम आणि अटी घातल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही बाब त्यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. राज्यात मागील २-३ वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यात अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. कमांड क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, हा नियम केल्याने बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट तातडीने काढून टाकावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. याच अनुषंगाने विधानसभेतील इतर आमदारांनी पीक विमा योजनेबाबत केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन याबाबत तातडीने बैठक बोलावून निर्णय करण्याबाबतचे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले.