रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५७ कोटी ५३ लाख रूपये मंजूर – चंद्रकांत पाटील

0
12

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सोलापूर जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये रब्बी पिकांचे झालेले नुकसान नुकसान दुष्काळाच्या निकषात बसत नाहीत. मात्र, राज्य शासनाने पीक विमा अंतर्गत येणा-या पिकांना पूर्ण भरपाई आणि ज्यांनी पीक विमा काढला नाही अशा पिकांना निम्मी भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसानभरपाईसाठी एकूण ५७ कोटी ५३ लाख रूपए देण्याचे मंजूर असून, ते तातडीने वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य संजय पोतनीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांना सन २०१५-१६ च्या दुष्काळाच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, सन २०१५-१६ मध्ये खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले. खरीप पिकांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र, केंद्र शासनाच्या विशेष तज्ञांनुसार परतीचा पाऊस आल्याने रब्बी पीक हे दुष्काळाच्या निकषात बसत नाही. मात्र, राज्य सरकारने रब्बी पीकांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आणि ज्यांनी पीक विमा काढला होता त्यांना पुर्ण भरपाई आणि ज्यांनी पीक वीमा काढला नव्हता त्यांना निम्मी भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पीक विमा काढला नाही अशा शेतक-यांना रब्बी पिकांसाठीची नुकसान भरपाई ही ५७ कोटी ५३ लाख एवढी असून, तातडीने ती वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचबरोबर, पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येण्याचा विचार करण्यात येईल तसेच कमांड क्षेत्रालाही दुष्काळात मदत करण्याचा निर्णय राज्य शासन घेईल असेही पाटील यांनी उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या संदर्भात सदस्य एकनाथ खडसे, सुनील केदार, सांगोला येथील शेकाप ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.