१० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

0
9

मुंबई,दि.03(विशेष प्रतिनिधी) – केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चाहूल लागली होती, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त येत्या 10 ऑक्टोबर  रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.या  विस्तारात काँग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करणारे नारायण राणे यांना सामावून घेण्यावर सध्या चर्चा होणार असून आज मुख्यमंत्री फडणवीस व राणे यांच्यात बैठक होणार असल्याने या वृत्ताला बळ मिळाले आहे. राज्याच्या मंत्री मंडळामध्ये जुन्या व नवीन आमदारांचा समावेश असून विदर्भातील आमदारांचा ही यामध्ये सहभाग राहणार असल्याचे बोलले जात आहे.या विस्तारात भंडारा जिल्ह्याला स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके किंवा तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये भाजपाच्या आमदारांना स्थान देण्यासोबतच इतर पक्षातील आमदारांना ही मंत्री पद मिळण्याची चिन्हे दिसून देत आहेत. सध्या मंत्री मंडळाचा विस्ताराबाबत यांचा नंबर लागेल की त्यांचा नंबर लागेल या विषयावर विविध चर्चा ऐकावयास मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच मंत्री मंडळात ज्या मंत्रीकडे जास्तीचे खाते आहेत, त्या मंत्र्यांचे काही खाते कमी करून आता नवीन आमदारांना मंत्री पदाचा कार्यभार देणार असल्याचे चर्चा सुरू आहे.