पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन

0
16

अलिबाग(रायगड),दि.03 : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आजपासून (मंगळवार) ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे 450 कर्मचारी सहभागी झाले आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास येत्या दहा तारखेपासून महसूल विभागाचे इतर कर्मचारीही ‘काम बंद’ आंदोलन सुरू करणार आहेत.यासबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यात महसूल विभागाचे 1238 कर्मचारी आहेत. त्यामुळे या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण वरंडे आणि सचिव संजय माने यांच्यासह पदाधिकारी आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते. दिवाळीच्या तोंडावर पुकारलेल्या या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबणार आहेत. शिधा दुकानांमध्ये संपूर्ण अन्नधान्य, साखर आणि रॉकेलचा पुरवठा करण्याचे काम पुरवठा विभागाकडून होते. तसेच, शिधा पत्रिकांचे वाटपही केले जाते. या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकेल.

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या.. 
1. महसूल लिपिकाच्या पदाचे नाव बदलून ‘महसूल सहाय्यक’ असे करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय जाहीर करावा.
2. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4,300 वरून 4,800 रुपये करण्याचे 1 जानेवारी 2006 पासून मान्य करण्यात आले होते. त्यानुसार शासन निर्णय जाहीर करावा.
3. अव्वल कारकून (वर्ग 3) या संवर्गाच्या वेतनश्रेणीमधील त्रुटी दूर करणे.
4. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत मान्य केले जाणार होते. त्याचा निर्णय जाहीर करावा.
5. पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे ही पदोन्नतीची असल्याने सरल सेवेने न भरणे.
6. नायब तहसीलदारांचे सरळ सेवा भरतीची पदांचे प्रमाण 33 टक्‍क्‍यांवरून 20 टक्के करून पदोन्नतीचे प्रमाण 80 टक्के मंजूर केलेले आहे. त्याचा शासन निर्णय जाहीर करणे.
7. आकृतीबंधाबाबत सुधारणा करण्यासाठी दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदे वाठविलेली आहेत. यात कोणतीही कपात न करता त्वरित मंजुरी देऊन शासन निर्णय जाहीर करणे.
8. इतर विभागाच्या कामासाठी नव्याने आकृतीबंध तयार करून मंजुरी आदेश काढणे.
9. महसूल विभागातील पदे पुनर्जिवित करण्याची कार्यवाही तत्काळ करावी. महसूल विभागाव्यतिरिक्त इतर विभागांतील पदांचा विचार करून संबंधित पदे पुनर्जिवित करण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी आदेश काढणे.
10. महसूल विभागातील वर्षानुवर्षे कार्यरत असलेली पदे अस्थायी स्वरूपाची असून ती स्थायी करण्यात यावीत.