एडीजी, आयजी चार दिवसांपासून गडचिरोलीत;नक्षल्यांविरूध्द कोंबींग ऑपरेशन सुरू

0
2
file photo

गडचिरोली,दि. ४ः- पोलिसांच्या वाढलेल्या आक्रमक कारवायांची धास्ती घेऊन बॅकफुटवर आलेल्या नक्षलवाद्यांनी चवताळून खोट्या गोष्टींचा आधारे निरअपराध सामान्य नागरीकांचे बळी घेतल्याने नागरीकांमध्ये नक्षल्यांविरूध्द तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नक्षल्यांच्या या घृणास्पद कृत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने दखल घेतली असून नक्षल्यांविरूध्द मोठे कोंबींग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. स्वतः अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष कृती) श्री. डी. कन्नकरत्नम व नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी मागील चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात तळ ठोकून बसले आहेत.यावेळी वरिष्ठ अधिका-यांनी घडलेल्या घटनांच्या ठिकाणी, तसेच शेजारी राज्याला लागून असलेल्या सीमा भाग व संवेदनशील परिसरातील विविध पोलिस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थिती समजून घेतली. नक्षल विरोधी अभियानात लढणा-या जवानांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना लढण्याचे बळ दिले.
गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन वर्षात पोलिसांना नक्षल विरोधी अभियानात मोठे यश प्राप्त झाले आहे. पोलिसांच्या आक्रमक रणनितीमुळे मोठ्या घटनांना आळा बसला. नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी व विकासाच्या विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेल्या जनसंपर्क व संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळू लागला आहे. पोलिसांच्या विशेष यशस्वी रणनितीमुळे मागील तीन वर्षात नक्षल्यांकडून केल्या जाणा-या घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. विविध चकमकीत मोठ्या प्रमाणावर नक्षली मारले जात असून नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांच्या अटकेची संख्या वाढली आहे. त्यामुळे नक्षल्यांचे संख्याबळ दिवसेंदिवस घटत चालले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्याने नक्षल्यांचे उर्वरीत संख्याबळही कमी झालेले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दर्शविल्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सध्यास्थितीत नक्षल्यांची चळवळ पुर्णपणे कमकुवत झाली आहे.
मागील तीन वर्षात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील घटनांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले असून चालू वर्षात गडचिरोली जिल्ह्यात भुसुरूंग स्फोटाच्या केवळ दोन घटना घडल्या. तीन वर्षात आत्तापर्यंत झालेल्या १५ चकमकींमध्ये २३ नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात आला. तर १३२ नक्षली व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली. तीन वर्षात तब्बल १२३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला.
पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. तसेच पोलिसांनी चहुबाजुने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी सध्या बॅकफुटवर येऊन हतबल झालेले आहेत. स्वतःचे अस्तित्व संपण्याच्या भितीमुळेच चवताळलेले नक्षलवादी खोट्या गोष्टींचा आधार घेऊन भ्याड हल्ले करीत आहेत. निरअपराध सामान्य नागरीकांचे बळी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसात नक्षल्यांच्या या भ्याड हल्ल्यांमुळे सामान्य नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले, तर दोन जवान शहीद झाल्यामुळे नागरीकांमध्ये नक्षलवाद्यांविरूध्द तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. या घटनांची शासनस्तरावरही उच्चस्तरीय दखल घेण्यात आली असून या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात अनेक ठिकाणी कोंबींग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक (ऑपरेशन) डी. कन्नकरत्नम व नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या नेतृत्वात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख हे प्रत्यक्ष या कोंबींग ऑपरेशनवर विशेष लक्ष ठेवून आहेत. या सर्व वरिष्ठ अधिका-यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी, नारगुंडा, अहेरी, धानोरा, ग्यारापत्ती यासह विविध संवेदनशील ठिकाणी भेटी देऊन घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच तेलंगाना व छत्तीसगढ राज्यांना लागून असलेल्या सीमांमधील पोलिस ठाणे, उप पोलिस ठाणे यांना प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिस अधिकारी व जवानांना अर्लट राहून नक्षलवादी कारवाया हाणून पाडण्याच्या सूचना दिल्या. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अधिका-यांशी चर्चा करून त्यांना विशेष सुचना देण्यात आल्या. यावेळी शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देऊन त्यांच्या परिवाराशी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. सध्या सर्व वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष गडचिरोलीत उपस्थित राहून या ऑपरेशनवर विशेष लक्ष ठेवून आहेत. ऑपरेशन राबविणा-या अधिकारी व जवानांना वेळोवेळी मार्गदर्शन करून विशेष सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे नक्षल विरोधी मोहिमेतील पोलिस अधिकारी व जवानांचे मनोबल उंचावून त्यांना विशेष बळ मिळाले आहे.