शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0
12

गडचिरोली,दि.४: संपूर्ण कर्जमाफी, जमिनीचे पट्टे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चाचे नेतृत्वा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले. या मोर्चात अहेरी विभाग जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख छायाताई कुंभारे, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला,  उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, वासुदेव शेडमाके, राजू कावळे,  अनंत बेझलवार, भरत जोशी, छाया रामगिरवार,  वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संतोष मारगोनवार,  घनश्याम कोलते,  नंदू कुमरे, पप्पी पठाण, विलास ठोंबरे, युवा सेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, श्याम धोटे, रामकिरीत यादव, माणिक भोयर, कवडू सहारे, डॉ.श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, आशिष काळे, रमेश मानकर, राजू रामपूरकर, अमित यासलवार, बिरजू गेडाम,कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके  यांच्यासह शेकडो शिवसैनिक, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.

मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, महिला आघाडीप्रमुख छाया कुंभारे, अहेरी विभाग जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम आदींची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात सरकारला खडे बोल सुनावले. दुष्काळ व रोगराईमुळे पिकाचे प्रचंड नुकसान होऊनही पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक दाखविण्यात आली. शेतकऱ्यांना भरपाई मिळू नये, यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अधिक पैसेवारी दाखवली, असा आरोप सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केला. आम्ही मोठ्या अपेक्षने भाजपला निवडून दिले. परंतु सत्तेत येताच भाजपने शेतकरी व शेतमजुरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका त्यांनी केली. आम्ही आधी भाजपला निवडून दिले, आता सरकारला खाली खेचण्याची धमकही शिवसेनेजवळ आहे, असा इशारा छाया कुंभारे यांनी यावेळी दिला.दुष्काळ व रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक साहाय्य करावे, अतिक्रमणधारकांना तत्काळ जमिनीचे पट्टे द्यावे, महसूल व वनविभागाने ताब्यात घेतलेल्या अतिक्रमणधारकांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, कुणबी व पेरकी जातींना क्रिमीलेयरमधून वगळण्यात यावे, बंगाली बांधवांना मिळालेल्या जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर करावे, आदिवासी बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा