मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केले पवारांच्या बारामती मॉडेलचे कौतुक

0
15

बारामती- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना गुरुचा दर्जा देत कौतुकांचा वर्षाव केला. पवार अनुभवी, जानते नेते आहेत. आम्ही सर्वांनीच त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असे सांगत फडणवीसांना संदेश दिला. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात पवारांच्या बारामतीच्या विकास मॉडेलचे कौतुक केले.

बारामती परिसरात झालेलं कार्य मी पाहिलं. त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचं अभिनंदन करतो. या केंद्रानं या भागात केलेला विकास हा मार्गदर्शक प्रकल्पासारखा आहे. या केंद्राद्वारे शेतीत विज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येईल. त्यामुळे उत्पन्न वाढून शेतकरीही आनंदी, सुखी करण्याचा मार्ग आपल्यासाठी खुला होऊ शकेल. भाजीपाल्याच्या आघाडीवर प्रगती साधण्यासाठी आज झालेला इंडो डच करार उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री आहे. आज राज्यापुढे कसोटीचा काळ आहे. राज्यातल्या 24 हजार गावांवर दुष्काळाची छाया आहे. मराठवाडा, उ. महाराष्ट्र, विदर्भासह प. महाराष्ट्रातल्याही अनेक गावांवर दुष्काळाची छाया गडद होते आहे. या परिस्थितीत सर्वाधिक गरजेचं आहे जलव्यवस्थापन. पाण्याचा योग्य वापर करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. पाण्याअभावी शेतीउत्पादन घटतं, शेतकरी समृद्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारही पावलं उचलतं आहे.
जलयुक्त शिवार योजनेद्वारे 20 हजार नेहमी दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेतसाठी प्रयत्न करण्यात येतो आहे. 5 हजार गावं कायमची दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकसहभागातून नक्कीच हे साध्य करू शकू, याची मला खात्री आहे. दुष्काळ किंवा अन्य संकटांमुळे आपण 90 लाख शेतकऱ्यांना मदत देणार आहोत. पण गेल्या काही वर्षांत भरपाईपोटी जितका खर्च झाला आहे, तितका कृषिविकासासाठी झालेला नाही, असं लक्षात येतं. पण कृषिविकासावर पैसे खर्च झाल्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही, शेतीमध्ये शाश्वतताही येणार नाही.
ऊसउत्पादकाला एफआरपी मिळायलाच हवी. पण साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घटतेय. या परिस्थितीत काय करायला हवं, यासाठी मी मध्यंतरी पवारसाहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. ऊसउत्पादक आणि साखर कारखाना या दोघांसाठी उपयुक्त अशीच भूमिका आपल्याला घ्यायला हवी. या परिस्थितीत जलव्यवस्थापनही महत्त्वाचं आहे. पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करणंही गरजेचं झालं आहे. केंद्राकडून राज्याला कृषी क्षेत्रासाठी नेहमीच भरीव आणि चांगली मदत मिळते. यापुढेही मिळेल. कृषी विज्ञान केंद्रांसारखे प्रकल्प राज्यात सर्वत्र उभारून आपल्याला शेतकरी नक्कीच समृद्ध करता येईल, असे मला वाटते.
देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंह बारामतीत येऊन मी अनेक प्रकल्पाचं काम पाहिलं आहे. इथल्या कामाकडून मला प्रेरणा मिळाली आहे. कृषी विज्ञान केंद्र देशातल्या कृषी क्षेत्रास मजबुती देण्यासाठी महत्त्वाचं आहे. या केंद्रांना मजबुती देणं हे माननीय पंतप्रधानांचंही स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजही देशात 65 टक्के भागात पाणी नाही. बारामतीतही बऱ्याच मोठ्या भूभागाला पाणी मिळत नाही, तरीही येथे चांगलं काम झालं आहेत. या आघाडीवर देशात सर्वत्र चांगलं काम व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच पंतप्रधान सिंचन योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक शेतात पाणी जात नाही, तोपर्यंत प्रत्येक हाताला काम मिळू शकणार नाही. प्रत्येक शेतात पाणी जात नाही, प्रत्येक हाताला काम मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.