बंग दाम्पत्य डी.लीट. पदवीने सन्मानित

0
9

गडचिरोलीता.१४’सर्च’ संस्थेचे संस्थापक आणि सुप्रसिद़ध समाजसेवक डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद़यापीठातर्फे नुकतीच डी.लीट.पदवी बहाल करुन सन्मानित करण्यात आले.,
पुणे येथे आज(ता.१४) आयोजित टिळक महाराष्ट्र विद़यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद़यापीठाचे कुलपती न्या.विश्वनाथ पळशीकर यांच्या हस्ते बंग दाम्पत्यास सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी विद़यापीठाचे कुलगुरु डॉ.दीपक जे.टिळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे अतिशय जुने विद्यापीठ असून, समाजकार्य, संशोधन, समाजशास्त्र, आयुर्वेद, संस्कृत व दूरस्थ शिक्षण इत्यादींकरिता सर्व परिचित अशा डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा असलेले विद्यापीठ आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ म.गांधी यांच्या सूचनेवरुन १९२१ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
डॉ.अभय व डॉ.राणी बंग हे ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयात शिक्षण घेतले असून, दारुबंदी, दारुमुक्ती, बालमृत्यू, आरोग्यसेवा, आदिवासी सेवा, युवक व युवती जीवन शिक्षण या विषयांवर मोठे कार्य केले आहे. बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘घ्ररोघरी नवजात बाळाची काळजी’ हा डॉ.बंग दाम्पत्याने विकसित केलेला उपक्रम वैशिष्ट़यपूर्ण असून, या विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनाला जगभरात मान्यता मिळालेली आहे. शिवाय त्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी.लीट. पदवीने सन्मानित केले आहे. यापूर्वी या विद्यापीठाने प्रोफेसर पी.एल.देशपांडे, प्रो.जी.व्ही. विंदा करंदीकर, पं.भिमसेन जोशी, किशोरी आमोणकर, श्री. योगाचार्य अयंगार, प्रो.ग.प्र.प्रधान, मोहन धारिया, डॉ.माधवराव चितळे, डॉ.वसंत गोवारीकर, डॉ.अनिल काकोडकर, प्रा.राम शेवाळकर, जयंत नारळीकर आदी मान्यवरांना डी.लीट.देऊन सन्मानित केले आहे.