महाराष्ट्राला ‘प्रभूं’चे दर्शनच नाही- सुनील तटकरे

0
16

मुंबई- महाराष्ट्राचे सुपुत्र, उच्चशिक्षित वगैरे सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने महाराष्ट्रवासी आणि त्यातही रेल्वे प्रवाशांच्या त्यांच्याकडून खूपच अपेक्षा होत्या. सुरेश प्रभू या अपेक्षांना न्याय देतील, अशी खात्री अनेकांना वाटत होती. मात्र, 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून या अपेक्षांचा फुगा फुटला आहे. या रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरी काहीच पडलेले नाही. रेल्वेला मोठा नफा मिळवून देणाऱ्या मुंबईच्या उपनगरी प्रवाशांकडेही रेल्वे अर्थसंकल्पातून लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुंबई वा महाराष्ट्रवासीयांना ‘प्रभूं’चे दर्शनच झाले नाही, असेच म्हणावे लागेल. महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही लावण्याची मागणीही जुनीच होती. प्रवासी, प्रवासी संघटना आणि अन्य कुठल्याही घटकास या अर्थसंकल्पातून काहीच मिळणार नसल्याने या अर्थसंकल्पाने सगळ्यांचीच निराशा केली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरेश प्रभूंनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. या बजेटद्वारे देशातली रेल्वे रूळावर आणण्याचे काम करण्यात आले आहे. कुठल्याही प्रदेशाला नाही तर सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन मांडलेले बजेट आहे. विरोधी पक्षांनी टीका केली आहे पण मित्रपक्ष शिवसेनेनेही नाराजी व्यक्त केल्याचे दानवेंना विचारले असता शिवसेनेच्या नाराजीबाबत ते म्हणाले, शिवसेना मुळातच आमच्यावर नाराज आहे तर आजच्या बजेटवर का असणार नाही? अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.