पाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणीसाठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
9

* ॲग्रोव्हीजन प्रदर्शनीचे उद्घाटन

* 21 हजार कोटीची कर्जमाफी

* शेतकऱ्यांना 27 हजार कोटींची मदत

नागपूर दि.23 : पावसाची तूट व अपुऱ्या सिंचन सोयीमुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता. मात्र राज्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून कामे करण्यात आली. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी 72 टक्के पाऊस होऊन सुद्धा विकेंद्रीत पाणीसाठ्यामुळे अनेक ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. ॲग्रोव्हीजन प्रदर्शनीमुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात ॲग्रोव्हीजन मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रेशीमबाग मैदानावर आयोजित दहाव्या ॲग्रोव्हीजन प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. तर केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहनसिंग, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषी मंत्री प्रेमकुमार, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ.विकास महात्मे, कृपाल तुमाने, रामदास तडस, अशोक नेते व कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
ॲग्रोव्हीजन प्रदर्शनीमुळे देशातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कार्य केले असून शेतकऱ्यांना 21 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कृषी संबंधीत 27 हजार कोटींचे अनुदान दिले. या चार वर्षात 48 हजार कोटीची मदत विविध मार्गाने शासनाने शेतकऱ्यांना केले आहे.दीड लाख शेततळे व दीड लाख सिंचन विहिरी निर्माण करुन कृषी सिंचनाची शाश्वत व्यवस्था शासनाने उभी केली आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 16 हजार गावात 5 लाख कामे केली आहेत. यावर्षी 72 टक्के पाऊस होऊन सुद्धा जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये अनेक जिल्ह्यात कृषी उत्पादन वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून अनेक वर्षापासून उपलब्ध असलेले 5 लाख कृषीपंप शासनाने वाटप केले आहे. 2 लाख सोलर कृषीपंपाची योजना तयार असून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कृषी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात असून ड्रोनच्या माध्यमातून कीड नियंत्रण करण्यासाठी फवारणी करण्यात येणार आहे. ॲग्रोव्हीजन प्रदर्शन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अन्नदाता सुखी असेल तर देश सुखी होईल. ॲग्रोव्हीजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम केले जात आहे. गावातच शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी महाराष्ट्राने केलेले कार्य अद् भूत असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशात 129 ऊस कारखाने असून मागीलवर्षी 40 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. ग्रीन इंधनापासून खूप मोठी बचत शक्य असून हा निधी शेती विकासावर खर्च केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना नवे व्हीजन प्राप्त झाले असून ॲग्रोव्हीजन शेतकऱ्यांना नवी प्रेरणा देणारे ठरेल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

कमी खर्च, उत्पादनात वाढ, पूरक उद्योग व सिंचन सुविधा यामुळे शेतीचा विकास होणार असून शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञान व मार्गदर्शन प्राप्त करुन देण्याचा ॲग्रोव्हीजनचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. कृषी उपजपासून इथेनॉल व बॉयोडिझेल निर्माण केल्यास कृषीला पूरक उद्योगाची जोड मिळेल. येत्या तीन-चार वर्षात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर डिझेलमुक्त होऊन तणस, पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या यांच्यापासून उत्पादित इंधनावर धावेल, असे गडकरी म्हणाले. या तंत्रज्ञानाची गडचिरोली येथे हब बनविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वर्षभर कृषी प्रशिक्षण मिळावे, यासाठी 25 कोटी रुपये खर्च करुन कायमस्वरुपी प्रशिक्षण संस्था ॲग्रोव्हीजन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गडकरी पुढे म्हणाले की, मत्स्य व्यवसाय, मुधमक्षीपालन, दुग्ध व्यवसाय यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला असून 40 विविध विषयांवर शेतकऱ्यांना तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय उद्योग महत्त्वाचे असून ज्या दिवशी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यादिवशी आमच्या प्रयत्नांना यश आले, असे म्हणता येईल.केंद्र शासनाने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून कृषी विकासाच्या विविध योजना आखल्या आहेत. देशातील 99 सिंचन प्रकल्पापैकी 40 सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून उर्वरित सिंचन प्रकल्प 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येतील. यामुळे देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील व पर्यायाने उत्पन्न वाढेल, असे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षात कृषी निर्यात वाढली असून याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. कृषी बजेट मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले असून मत्स्य व दुग्ध व्यवसाय यावर मोठ्या प्रमाणात निधी ठेवण्यात आला आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत आहे. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत लाभ झालेल्या शेतकऱ्यांत महाराष्ट्रातील सर्वाधिक 65 टक्के शेतकरी आहेत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित दुप्पट होईल, असा विश्वास राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला.ॲग्रोव्हीजन प्रदर्शनीची स्मरणिका व डिरेक्टरीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनीत 350 पेक्षा जास्त संस्था सहभागी झाले आहेत. मध्य भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन असून देशातील शेतकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश मानकर यांनी केले. प्रारंभी ॲग्रोव्हीजन आयोजना संदर्भात रवि बोरडकर यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. स्वागत गिरीश गांधी यांनी केले. यावेळी बांबूपासून तयार केलेल्या विशेष वस्त्र तसेच नागपूरची संत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली. कार्यक्रमास मध्य भारतातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Image may contain: 16 people, people smiling, people standing and wedding
Image may contain: 9 people, people standing