शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : चंद्रिकापुरे

0
16

सडक अर्जुनी ,दि.२३ः: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची आर्थिक व्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी समृद्ध झाला तर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मोठी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी परंपरागत पीकपद्धती व लागवडीच्या कौशल्यात परिवर्तन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.ते माहुली येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या नाटकाचे उद्घाटन जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे यांनी केले. यावेळी कृउबासचे सभापती डॉ. अविनाश काशिवार तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसारीटोलाचे सरपंच उमराव गहाणे, के.बी. परशुरामकर, डॉ. महेंद्र टेंभरे, अभिमन गहाणे, हरिश्चंद्र उईके, मनोहर खांडेकर, सयाजी कापगते, इंदिरा कापगते, खूपन कापगते, उमराव बोरकर, कावळे, हटवार, नाजुकबाई ठाकरे, भागवत कापगते, पुष्पा कापगते, कृपण कापगते, ज्ञानीराम कापगते, प्रभूदयाल लोहिया उपस्थित होते.

चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, नाटक हे ग्रामीण भागातील मनोरंजन व समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. या प्रबोधनातून प्रत्येकाने त्यांच्या जीवनात नाट्यप्रयोगातील योग्य बाबी आचरणात आणाव्यात. त्यांनी या नाटकाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पारंपरिक शेतीत लागवड करणाऱ्या पिकाऐवजी नवनवीन प्रयोग केले पाहिजे. फळबागा लावून नगदी पिकांकडे वळले पाहिजे. सिंचनात ठिंबक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीच्या उत्पन्नात वृद्धी होते. शेतीविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून त्याचे अनुकरण केल्यास शेतकरी समृद्ध होईल. येथील शेतकरी पीक लागवड पद्धतीत बदल करण्यास कुचराई करतो, मात्र जोवर जोखीम पत्करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती शक्य नाही. अमाप शेती असतानाही शेतकरी सुखी नाही ही बाब कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. यासाठी काही प्रमाणात पारंपरिक शेती व काही शेतीत पीक बदलाचा प्रयोग करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र उईके यांनी केले. संचालन सुभाष वाढवे यांनी केले तर आभार देवेंद्र कापगते यांनी मानले.