गोंदियाच्या शिक्षक साहित्य संमेलनात शरद पवार येणार; संमेलनाच्या अध्यक्षपदी वामन केंद्रे यांची निवड

0
5

गोंदिया,दि.08 : गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक आणि नाटककार प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली असून खासदार प्रफुल्ल पटेल संमेलनाचे उदघाटन करणार आहेत. २३ डिसेंबर २०१८ रोजी नटवरलाल माणिकलाल दलाल आर्टस् व कॉर्मर्स महाविद्यालय, गोंदिया येथे हे साहित्य संमेलन होत आहे.

शिक्षक साहित्य संमेलनाचे संस्थापक आमदार कपिल पाटील, माजी खासदार नाना पटोले, कवयित्री प्रभा गणोरकर, संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्यासह राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील व गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने यांनी दिली आहे.

आठ वर्षांपूर्वी शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरु झाले. यापूर्वीची सात संमेलनं मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत.गोंदिया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी २२ डिसेंबर रोजी ग्रंथदिंडी, टॉक शो, झाडीपट्टीतील नाटके आणि मुख्य सोहळा २३ डिसेंबर रोजी उदघाटन सोहळा, निमंत्रित कवींचे संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.