नाशिक ते मुंबई विधानभवनावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च

0
21

कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी
नाशिक/मुंबई. ( प्रतिनिधी ) , दि. १५ :–  राज्यातील सर्व आस्थापनेवरील व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांना कायम समायोजन करण्यात यावे असा निर्णायक आंदोलन म्हणून 52 संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च होणार असल्याची माहिती अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी नाशिक येथील श्री चिंतामणी मंगल कार्यालय येथे घोषित केले आहे.
यावेळी अध्यक्ष जाधवर म्हणाले की, गेली अनेक वर्षे कंत्राटी कर्मचारी शासनाला सेवा देत आहे. शासन आम्हाला फक्त वापरून सोडून देत आहे. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांवर कंत्राटी कर्मचारीच राबवत आहे. प्रशासन जाणूनबुजून काना डोळा करत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री, रोजगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना कंत्राटी कर्मचारी यांच्या अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. शासकीय कंत्राटी कर्मचारी अत्यंत अत्यल्प मानधनावर तसेच कुठलीही सामाजिक सुरक्षितता राज्य शासनाने दिलेली नसताना कार्यरत आहेत राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबत अद्याप कुठलीही भूमिका घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन तसेच रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करणेबाबत निकाल दिलेले असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागण्याचा शासन विचार करत नसल्यामुळे “कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी” यानुसार आपला प्रश्न राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सोडवावेत यासाठी नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च दि. 23 फेब्रुवारी ला नाशिक येथून सुरु होऊन दि. 26 फेब्रुवारी रोजी मुंबई विधानभवन येथे धडकणार आहे. असे म.रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी सांगितले.

दरम्यान मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी म्हणाले की, संपूर्ण राज्यात 05 लाख कंत्राटी कर्मचारी आज मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व विभागात काम करत आहे. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहे. वर्षानुवर्षे त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी परमनंट केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत सर्व आस्थापनेवरील व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समायोजन करावे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे मुलाणी म्हणाले. यासाठी सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी संघटना, म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या व आयटक च्या नेत्रत्वात नाशिक ते मुंबई लाँग मार्च चे नियोजन करण्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी केली आहे.
यावेळी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकुंद जाधवर, आयटक चे विजय कांबळे, सरचिटणीस शहाजी नलवडे, कार्याध्यक्ष सचिव जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, प्रवक्ते भगवान भगत, महिला अध्यक्ष माधुरी थोरात आदी उपस्थित होते.