उद्धव ठाकरेेंनी घेतली शहीद सुधीर अमिन यांच्या कुटुंबियांची भेट

0
5

मुंबई दि. १८- काळबादेवीतील गोकुळ निवास इमारतीची आग विझवताना शहीद झालेले उपअग्निशमन प्रमुख सुधीर अमीन यांच्या कुटुंबीयांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दुपारी 1 च्या सुमारास उद्धव ठाकरे मोजक्या लोकांसमवेत अमिन यांच्या घरी गेले. शिवसेना तुमच्या पाठिशी कायम राहील व पालिकेकडून झालेल्या विलंब व अन्याय दूर करू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी अमिन यांच्या पत्नी शर्मिला यांना दिले.
काळबादेवीतील गोकुळ निवास इमारतीची आग विझवताना शहीद झालेले उपअग्निशमन प्रमुख सुधीर अमीन यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने नुकसानभरपाई देऊ केली होती. परंतु अमीन कुटुंबीयांनी पालिकेने देऊ केलेली ही नुकसानभरपाई स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. पदोन्नतीच्या नियमानुसारच भरपाई द्या, अन्यथा तुमची भरपाई आम्हाला नको, असे सांगतानाच अमीन यांची पदोन्नती नऊ महिने का रखडवली, असा सवाल शर्मिला यांनी महापालिका अधिका-यांना विचारला होता.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अमीन कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी अमीन कुटुंबीयांना विभागीय अधिकारी पदानुसार नुकसानभरपाई देऊ केली होती. मात्र शर्मिला अमीन यांनी भरपाई स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना मृत्यूआधी दोन दिवसांपूर्वी पदोन्नती दिली तर पदोन्नतीच्या नियमानुसारच भरपाई आणि त्याचे लाभ देण्याची मागणी शर्मिला अमीन यांनी केली. पालिकेने त्यांच्या मागणीची दखल घेऊन नव्याने व पदोन्नतीनुसार भरपाई देऊ असे अश्वस्त केले आहे.