दलित महिलेचा भूकबळी : दोन मुले झाली पोरकी

0
26

तिरोडा दि.२८: पोटात अन्न नसल्यामुळे भूकेने व्याकूळ एका दलित विधवा महिलेचा मृत्यू होण्याची घटना तिरोडा शहरातील जगजीवनराम वॉर्डात शुक्रवारी दुपारी घडली. मृत महिलेचे नाव ललिता शिवकुमार रंगारी (३६) असे आहे. तिच्या मृत्यूमुळे तिची दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.
येथील ललिता रंगारी यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा अंध असल्याने तो ललिता यांच्या सोबतच राहतो, तर लहान मुलगा सातव्या वर्गात शिकत असून तो शिक्षणासाठी आपल्या मामांकडे राहतो.
पतीच्या मृत्यूनंतर घरी कमावता कुणीच नसल्याने ललिता यांनाच कामे करावी लागत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या घरात खाण्यासाठी काहीच नव्हते. परिणामी त्या मागील आठ दिवसांपासून आपल्या अंध मुलासह उपाशी होत्या. त्यातच शुक्रवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अन्नपाण्यावाचून राहिल्यामुळेच ललिताचा मृत्यू झाल्याचा अंदाज शेजार्‍यांनी वर्तविला.