भंडारा आयुध निर्माणीत स्फोट

0
8

भंडारा दि.२८: भंडारा आयुध निर्माणीत शुक्रवारी सायंकाळी एन.सी. वन या स्टोअर रूममध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे पाच कि.मी. परिसरात हादरे बसले. त्यामुळे जवाहरनगर परिसरात भूकंप झाल्याचा भास झाला. या स्फोटामुळे स्टोअर रूम इमारतीला तडे गेले. या स्फोटाचे कारण कळू शकले नसून याबाबत आयुध निर्माणीत संपर्क साधला असता अधिकारी बोलायला तयार नाहीत.
भंडारा आयुध निर्माणीमधील एनसी स्टोअर रूममध्ये मागील काही वर्षांपासून नायट्रोसेल्यूलस पावडरचा साठा भरून ठेवला आहे. शुक्रवारी सायंकाळी तेथे अचानक स्फोट झाला. यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटाच्या अतितीव्रतेमुळे पाच कि.मी. अंतरावरील ठाणा या परिसरात स्फोटाचे हादरे जाणवले. जमीन हादरल्यामुळे लोक घराबाहेर पडले. स्फोटामुळे खिडक्या दरवाजे हलल्याचे ठाणा येथील नागरिकांनी सांगितले. स्फोट झालेल्या इमारतीच्या १८ इंच जाडीच्या भिंतीचे अक्षरश: तुकडे पडले. तेथील मोठमोठे लोखंडी रॉड व एंगल्सचेही तुकडे झाले. इमारतीच्या १00 मीटर परिसरातील अन्य इमारतीतील लोखंडी दरवाजे, खिडक्या तुटून पडले. खिडक्यांची काच दूरवर फेकले गेले.