महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांचे निश्चितच समाधान होणार-राजदुतांना ग्वाही

0
13

मुंबई, दि.2: महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथे येणाऱ्या विदेशीगुंतवणूकदारांचे निश्चित समाधान होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दहा देशांतील भारतीय राजदूतांना दिली.

            विविध देशांतील भारतीय राजदूत महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आले असून त्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, उद्योग, पर्यटन, स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात गुंतवणुकीची महाराष्ट्रात मोठी संधी आहे.भारतीय राजदुतांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बलस्थानांची ओळख तेथील
गुंतवणूकदारांना करून द्यावी. भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक  गुंतवणूक भारतात यावी यासाठी मेक इन इंडिया सप्ताह मुंबईत आयोजित
करण्याची संधी महाराष्ट्राला दिली. या जागतिक परिषदेच्या माध्यमातून जगातील विविध कंपन्यांनी देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे.

     जागतिक औद्योगिक गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आश्वासक वाटत आहे, अशी परिस्थिती आणि साधनसामग्री आम्ही उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र हे विदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले असून राज्यातील पर्यटनवाढीसाठी 2017 हे वर्ष ‘महाराष्ट्र भेटी’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. भारतीय राजदुतांनी महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रांची माहिती आपआपल्या देशांमध्ये पोहोचवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 मुख्य सचिव श्री. क्षत्रिय यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रशियामधील भारतीय राजदूत पंकज सरन,फ्रान्समधील राजदूत रुचिरा कंभोज, किरगिझस्तानमधील राजदूत जयंत खोब्रागडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

बैठकीस चिलीमधील भारतीय राजदूत देबराज प्रधान, रवी बांगर (सायप्रस), राजीव शहारे (डेन्मार्क), विश्वास सपकाळ (फिजी), व्ही महालिंगम् (गयाना), नरेंद्रकुमार सक्सेना (पापूआ न्यू जिनिव्हा), अहमद जावेद (सौदी अरेबिया) या भारतीय राजदूतांसह राज्याचे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक उपस्थित होते.