अदानी पॉवरने प्रवासी सुविधा द्यावी-सीसीएम शिवराजसिंह

0
10

रेल्वेच्या सीसीएमने सोपविला प्रस्ताव : अदानी व्यवस्थापनासोबत झाली चर्चा

गोंदिया,दि.03 : एका बोगीच्या विशेष ट्रेनने गोंदियात आलेल्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (सीसीएम) शिवराजसिंह यांनी शुक्रवारी (दि.२) अदानी पॉवर प्लॉन्टचे मुख्य व्यवस्थापक सी.पी. शाहू यांची भेट घेतली व त्यांना एक प्रस्ताव सोपविला. या प्रस्तावात शिवराजसिंह यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध करविण्याच्या दृष्टीने अदानीने पुढाकार घेण्यास सांगितले. यावर शाहू यांनी सदर प्रस्ताव आपल्या वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार आता प्रवासी सुविधांना खासगी व्यक्ती किंवा संस्थांच्या सहकार्याने चालविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार गोंदिया शहरातील खासगी व्यक्ती किंवा संस्था जर सहकार्य करण्यासाठी तत्पर असेल तर ते त्यांची सेवा प्राप्त करू शकतात. त्यांनी सांगितले की, अदानी पॉवर प्लॉन्टच्यावतीने कोणत्याही सुविधा पुरविल्या जातील तर त्यांचे स्वागतच आहे.

अदानी पॉवरने तिरोडा व काचेवानी रेल्वे स्थानकांवर बेंच व खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. शिवाय तेथे छताची व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशाच सुुविधा गोंदिया रेल्वे स्थानकावरही शक्य आहेत. छत निर्माणापासून वॉटर कुलिंग, वॉटर हार्वेस्टिंग, पिण्याचे पाणी, बॉयो टॉयलेट, प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी ट्रॉली, स्वच्छ भारत एजेंडा चालविण्यासाठी कोणतीही सुविधा अदानी पॉवरकडून उपलब्ध केल्या जावू शकतात. शिवाय अदानी पॉवर जर एखादा नवीन प्रस्ताव देईल तर तोसुद्धा स्वीकार करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवजरासिंह यांनी गोंदिया रेल्वे स्थानक व रेल्वे लोहमार्गाची पाहणीसुद्धा केली.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शिवराजसिंह यांचे गोंदियात येण्यामागे आणखी एक उद्दिष्ट होते. अदानी पॉवरच्या राखेला देशातील इतर भागात पोहोचविण्यासाठी अदानी व्यवस्थापनाशी त्यांना चर्चा करावयाची होती. या वेळी उद्योजकांपर्यंत सदर राख पोहोचविण्याची तयारी रेल्वेने दाखविली. सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे उद्योजक तयार आहेत. जर अदानी पॉवरकडून सहमती मिळाली तर येणाऱ्या दोन महिन्यांत अदानी पॉवरची राख विविध उद्योजकांपर्यंत सिमेंट तयार करण्यासाठी पोहोचविणे सुरू करण्यात येईल. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढेल व अदानी पॉवरजवळ कोळशाच्या ज्या राखेचे ढिग जमा झाले आहेत ते कमी होतील. शिवाय अदानी पॉवरच्यावतीने विटांच्या निर्मितीसाठी राख नि:शुल्क उपलब्ध करवून दिली जात आहे.