न.प.निवडणुक : ९ डिसेंबरपासून अर्ज देणे व घेणे होणार सुरू

0
14
OLYMPUS DIGITAL CAMERA

गोंदिया,दि.03 : नगर परिषदेच्या २१ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. एका प्रभागातून दोन अशा एकूण ४२ नगर परिषद सदस्यांच्या पदासाठी येत्या ८ जानेवारी रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी ९ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र देणे व घेणे सुरू होणार आहे. तर ८ जानेवारी रोजी शहरातील ३४ इमारतींमधील १४३ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम शमली असतानाच सर्वांंच्या नजरा आता नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. यंदा शहरातील एक प्रभाग वाढवून घेत २१ प्रभाग करण्यात आले असून चार ऐवजी दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. शिवाय नगर अध्यक्ष आता थेट जनतेलाच निवडायचा असल्याने शहरवासीयांची उत्सुकता निवडणुकीला घेऊन अधिकच वाढली आहे. यामुळेच कधी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

या निवडणुकीला घेऊन आजी-माजी व नवख्यांनी आपापली तयारी सुरू केली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठीही आजी-माजींसोबतच नवख्यांची नावे पुढे येत आहेत. आता निवडणुकीला जेमतेम एकच महिना उरला असल्याने इच्छूकांची धावपळ वाढली आहे. त्यात राजकीय पक्षांच्या तिकीटसाठीही सेटींग सुरू आहे. निवडणुकीला घेऊन इच्छूकांची धावपळ सुरू असतानाच एका राजकीय पक्षाला ४२ उमेदवार रिंगणात उतरावयाचे असल्याने पक्षांचीही दमछाक होत आहे. तर यासोबतच निवडणुकीला घेऊन नगर परिषद कर्मचारीही धावपळीला लागले आहेत. निवडणुकीत काही त्रुट्या राहू नये या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तयारीला वेग आला आहे. यात मतदान कें द्र व मतमोजणीची तयारी यासह अन्य कामकाजावर नजर ठेवली जात आहे. येत्या ८ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी शहरातील ३४ शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीतील १४३ केंद्रांवर मतदान होणार आहे.

तिरोड्यात ८ प्रभागांसाठी निवडणूक

तिरोडा शहरातील आठ प्रभागातील १७ सदस्यांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. गोंदिया व तिरोडा या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सारखाच आहे. विशेष म्हणजे सध्या तिरोडा नगर परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. १५ सदस्य राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे असून एक सदस्य भाजप व एक सदस्य कॉंग्रेसचा आहे. आता या निवडणुकीत काय परिस्थितीत निर्माण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

९ जानेवारीला होणार मतमोजणी

येत्या ८ जानेवारी रोजी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रीया घेतली जाणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी ९ जानेवारी रोजी जवळील ग्राम फुलचूर येथील शासकीय तत्रनिकेतन महाविद्यालयात तर तिरोडा येथील मतमोजणी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० वाजतापासून केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष येत्या ८ व ९ तारखेकडे लागले आहे. आता या निवडणुकीत मतदार राजा कुणाला नगर परिषदेत पाठवितो हे येणाऱ्या ९ जानेवारी रोजीच कळणार.