भद्रावती येथे ओबीसीं महामोर्चासाठी नियोजन सभा

0
17

ओबीसींचा वणवा पेटणार : ५२ टक्के आरक्षणाची मागणी

भद्रावती,दि.03 : ओबीसी संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षणासाठी ओबीसींचा वणवा आता पेटणारच, असा संकल्प हजारो ओबीसी बांधवांनी येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित मोर्चाच्या नियोजन सभेत केला. ८ डिसेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.या सभेचे आयोजन ओबीसी कृती समिती, युवा ओबीसी कृती समिती, महिला ओबीसी कृती समिती भद्रावतीतर्फे करण्यात आले होते.

महामोर्चा आयोजनाच्या या नियोजन सभेत मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी झाले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी स्वयस्फुर्तेतपणे अनेकांनी योगदान दिले. तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मोर्चा यशस्वी होण्यासाठी ओबीसींच्या संवैधानिक आरक्षणाची माहिती सर्वसामान्यांना पोहचविण्यात यावी, महिला संघटनांच्या कमिट्या तयार करण्यात याव्या, महाविद्यालयीन युवक-युवतींना याबाबत प्रोत्साहीत करण्यात यावे. नाट्य रूपांतरच्या मदतीने ओबीसीबाबत माहिती सांगण्यात यावी, कॉर्नर सभा घेण्यात याव्या असे याप्रसंगी ठरविण्यात आले.

मोर्चाबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक, भद्रावती येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी १ वाजता तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक शिंदे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. ३ जानेवारीला हुतात्मा स्मारक येथे दुपारी १ वाजता महिलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘जय ओबीसी, मी ओबीसी’ या घोषणेने सभेच्याप्रसंगी सभागृह दणाणून गेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर होते. मंचावर अनंता ताठे, सुनील आवारी, सुधीर सातपुते, बंडू मांडवकर, बंडु दरेकर, दीपक निकुरे आदी उपस्थित होते. या सभेत प्रवीण सातपुते, रवींद्र शिंदे, पांडुरंग टोंगे, अनिल दिवसे, उमेश कांबळे, गोपाल गोमवाडे, प्रा. घोमरे, सुनील नामोजवार, विठ्ठल बदखल, अतुल कोल्हे, लक्ष्मण बोढाले, रोहन कुटेमाटे , वैद्य व अन्य बांधवांनी मार्गदर्शन केले. ओबीसींना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संचालन व प्रास्ताविक बंडू दरेकर यांनी केले.ओबीसी कृती समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारला गांधी चौक भद्रावती येथे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे हस्ते पार पडले.